अहमदनगरमध्ये ‘लोकमत’चे स्टिंग आॅपरेशन : लिंगबदलाचा दावा करणारा ‘मेजर बाबा’ जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 05:29 AM2018-08-12T05:29:29+5:302018-08-12T05:30:22+5:30
स्मशानातील कोळसा वापरून लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा लोकमतने स्टिंग आॅपरेशन करून अखेर पर्दाफाश केला.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : स्मशानातील कोळसा वापरून लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा लोकमतने स्टिंग आॅपरेशन करून अखेर पर्दाफाश केला. बबन सीताराम ठुबे (६६) हा अहमदनगर जिल्ह्यातील कान्हुर पठार (ता. पारनेर) येथे ३० वर्षांपासून बिनबोभाटपणे लोकांना फसवित होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या.
ठुबे हा पत्नी आणि मुलासोबत राहतो. मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयातून बीएएमएस झालो. त्यानंतर सैन्य दलातून निवृत्त झालो, असा दावा तो करत होता. त्यातून तो ‘मेजर बाबा’ म्हणून प्रसिद्ध झाला. जादूटोणा करून बाबांच्या औषधाने मूल होते, असे लोक सांगायचे. स्मशानातील कोळशाचा वापर करून वशीकरण, करणी अथवा जादूटोणा तो करायचा. गळ््यात स्टेथोस्कोप घालून ठुबे हा महिलांना गर्भलिंग बदल, लिंगबदल तसेच मूल होण्यासाठी औषध द्यायचा.
१० हजार महिलांना अपत्यप्राप्ती?
मी दिलेल्या औषधांमुळे आतापर्यंत १० हजारांहून अधिक महिलांना अपत्यप्राप्ती झाली आहे, असा दावा बबन सीताराम ठुबे हा करत होता.
असे केले स्टिंग आॅपरेशन
ठुबेचा ‘लोकमत’ने आयएलएस कॉलेजचा विद्यार्थी अश्विन भागवतच्या मदतीने पर्दाफाश केला. ‘लोकमत’ने ही बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या निदर्शनास आणून देताच, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने त्याला अटक केली. ठुबेला न्यायालयाने १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. कुटुंब रंगले भोंदूगिरीत... ठुबेसह त्याची पत्नी लता, मुलगा विजय, मुलगी सुनीता खोडदे, सासरा माधव सोनावळे, मुलगा अण्णा सोनावळेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
(सविस्तर वृत्तांत उद्याच्या अंकात)