‘लोकमत’ स्टिंग; चार दिवसांत हजारो लिटर साठ्याची रात्री वाहतूक,कारवाईच्या धास्तीने कंपन्यांना कीटकनाशके परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:41 AM2017-10-14T03:41:46+5:302017-10-14T03:41:58+5:30
शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली
सुरेंद्र राऊत
यवतमाळ : शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली असून चार दिवसांत हजारो लिटर कीटकनाशके रात्री हलविण्यात आले. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून हे वास्तव उघडकीस आले.
फवारणीच्या बळीनंतर मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाºयांनी यवतमाळात धाव घेतली. चौकशीत कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर यंत्रणा स्वत:ला निर्दोष असल्याचे दाखविण्यासाठी धडपड करत आहे. आतापर्यंत सात जणांवर कारवाई करून कृषी यंत्रणा पुन्हा थंडावली आहे. त्याचा फायदा कृषी सेवा केंद्रांनी कीटकनाशकांनी भरलेले गोदाम रिकामे करण्याचा सपाटा लावला आहे.
दिवसभर दुकानाचे शटर बंद करून कीटकनाशकांचे पॅकिंग केले जाते. रात्री १० वाजेनंतर ती हलविली जातात. चार दिवसांपासून हा प्रकार सर्वत्र सुरू आहे. बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास दत्त चौक परिसरात एका कृषी केंद्रासमोर एका मेटॅडोअरमध्ये कीटकनाशके भरली जात होती. चौकशी केल्यानंतर उरलेले बियाणे व कीटकनाशके कंपनीला परत पाठवित असल्याचे संबंधितांनी सांगितले. मात्र शटर बंद करून काही लोक आतमध्ये पॅकिंगचे काम करीत होते. परंतु माहिती देताना त्यांची बोबडी वळल्याचे दिसत होते.
कंपन्यांचे अधिकारीही उपस्थित : कीटकनाशक विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू झाल्याने कंपन्यांचे मार्केटिंग अधिकारी, कर्मचारीसुद्धा यवतमाळात मुक्कामी होेते. त्यांच्याच सल्ल्यानुसार हा माल कंपन्यांकडे परत पाठविला जात आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी माल भरताना हे अधिकारीही तेथे उपस्थित होते. विशेष म्हणजे कारवाईच्या भीतीने अनेक मान्यताप्राप्त कीटकनाशकांचा साठा देखील कंपन्यांना परत पाठविण्याचा सपाटा लावला आहे.