लोकमतचे फोटो एडिटर सुधारक ओलवे यांना पद्मश्री पुरस्कार
By Admin | Published: January 26, 2016 03:37 AM2016-01-26T03:37:08+5:302016-01-26T08:12:30+5:30
देशातील सर्वोच्च नागरी मानले जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली. या पुरस्कारांच्या यादीत
- चंद्रशेखर कुलकर्णी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - देशातील सर्वोच्च नागरी मानले जाणा-या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली. या पुरस्कारांच्या यादीत लोकमत समूहाचे फोटो एडिटर आणि ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांचाही समावेश आहे. सुधारक ओलवे यांना सामाजिक कार्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लेन्समागची सुधारक दृष्टी...
लोकमत वृत्तपत्र समूहाचा फोटो एडिटर सुधारक ओलवे याचं नाव पद्मश्री किताब जाहीर झालेल्यांच्या यादीत झळकलं. लोकमत परिवारासाठी ही कमालीची आनंदाची आणि तितकीच अभिमानाची बातमी ठरली. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या लोकमतमधल्या प्रत्येकाचा उर आनंदानं भरून आलेला. पण हा आनंद ज्याच्यामुळं झाला, तो सुधारक या घडीला जर्मनीत आहे. त्याच्यापर्यंत या भावना पोहोचल्या. इथं त्याच्यासाठी झालेला आनंद अवर्णनीय आहे.
पद्मश्रीसाठी त्याची निवड झाली यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही. हा सन्मान जितका त्याच्या फोटोग्राफीचा आहे, तितकाच किंवा त्याहून काकणभर जास्तच लेन्समागच्या त्याच्या सुधारक दृष्टीचा आहे. नवकोट नारायणांची संपत्ती, डोळे दिपवणारं ऐश्वर्य टिपण्यात सुधारकचं मन कधी रमलं नाही. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या या फोटोग्राफरचा जीव कायम वंचितांच्या प्रतिष्ठेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी जळत राहिलाय. बरं ही भावना कोरड्या तत्वज्ञानासारखी नाही. सुधारकनं स्वतः आधी केलं मग सांगितलं.
आजच्या घडीला जर्मनीत असलेला हा फोटोग्राफर जग पादाक्रांत करून आलाय. वॉशिंग्टनपासून अॅमस्टरडॅमपर्यंत आणि ढाक्यापासून दिल्लीपर्यंत अनेक ठिकाणी त्याच्या फोटोग्राफसची प्रदर्शनं झाली. पण याचा जीव घुटमळतो, तो भारताच्या कानाकोप-यात आजही सामाजिक न्यायापासून वंचित राहिलेल्यांच्या आयुष्याभोवती. जे जिणं आपण औटघटकेपुरतंही जगू शकत नाही, ते जगत राहणा-या, तुमच्या आमच्या सुखकर आयुष्यासाठी नरकयातना भोगणा-या कष्टक-यांच्या असह्य दिनक्रमाभोवती. टीचभर पोटासाठी रेड लाइट एरियात स्वतःचं आयुष्य अंधारात ढकलणा-या हजारो अनाम मुली-बायकांच्या अगतिकतेभोवती. अकोल्यातून मुंबईत आलेल्या सुधारकचे डोळे संपत्तीच्या प्रदर्शनानं दिपत नाहीत, पण सामाजिक अन्यायाच्या दर्शनानं नक्की पाणावतात.
हे सारं त्याच्या सुधारक दृष्टीनं वेळोवेळी टिपलं. ते दाहक सत्य खूप बोलकं होतं. तरीही तो स्वतः त्याविषयी संधी मिळेल, तेव्हा बोलत राहिला. आजही बोलतो. त्याच्या मनात शोषित पीडितांविषयी असलेली कणव अस्सल आहे. तो स्वतः आजही समाजातला सर्वात तळातला माणूस असल्यासारखा वागतो, बोलतो. मुख्य म्हणजे कृती करतो.
कोणताही अभिनिवेश न ठेवता तो मुंबईतल्या सफाई कामगारांच्या मुलांसाठी दर वीकेण्डला विनामूल्य फोटोग्राफीचं शिबिर चालवतो. तो स्वतःला रस्त्यावरचा मानतो. आणि रस्त्यावरच्या सामान्यातल्या सामान्य माणसासाठी आपली कला वापरतो.
ज्या दिवशी तो कॅमेरा क्लिक करत नाही, त्या दिवशी तो अस्वस्थ होतो. एकही चांगला फोटो टिपला नाही म्हणजे दिवस वाया गेला असं त्याला वाटतं...ती त्याच्यातल्या अस्वस्थ फोटोग्राफरची आणि तितक्याच संवेदनशील माणसाची ओळख आहे.
सुधारकला नीट ओळखणारा कुणीही त्याच्या साध्या राहणीवरनं त्याची परीक्षा करीत नाही. त्याच्या हातातला कॅमेरा सोडला, तर त्याला ब्रॅण्डचं ना फॅड आहे, ना वेड.
आता तर तो स्वतःच ब्रॅण्ड बनलाय...
सुधारक तुला मिळालेल्या या पोचपावतीबद्दल लोकमत परिवाराचा उर आनंदानं भरून आलाय...तुझ्या प्रत्येक चाहत्याच्या मनात हीच भावना असणार. जिथे मराठी तिथे लोकमत ही ओळख बनलेल्या आपल्या समूहाच्या वतीनं तुझं मनःपूर्वक अभिनंदन.