मुंबईत २ जागांचा तिढा सुटेना; महायुतीत ठाणे, पालघरचेही ठरेना, मविआत काँग्रेसला उमेदवार सापडेना
By दीपक भातुसे | Published: April 22, 2024 07:41 AM2024-04-22T07:41:18+5:302024-04-22T07:42:11+5:30
Loksabha Election - मुंबईतील सहा जागांपैकी महायुतीत अधिकृत घोषणा झाली नसली तरी पाच जागांचे वाटप निश्चित झाले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तरी महायुतीत काही जागांचा पेच अद्याप कायम आहे, तर महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाले असले तरी काही मतदारसंघांतील उमेदवार कोण, याबाबत प्रश्न आहे.
मुंबईतील सहा जागांपैकी महायुतीत अधिकृत घोषणा झाली नसली तरी पाच जागांचे वाटप निश्चित झाले आहे. मात्र, मुंबई दक्षिणची जागा भाजपला जाणार, की शिंदेसेनेकडे राहणार, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. इथे उद्धवसेनेने खासदार अरविंद सावंत यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली असून, त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात उमेदवार कोण, हे भाजपला अद्याप ठरवता आलेले नाही. पूनम महाजन सध्या इथून खासदार आहेत. मात्र, भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची चर्चा आहे.
नको असलेला मतदारसंघ काँग्रेसच्या गळ्यात
महाविकास आघाडीत मुंबईतील सहा जागांचे वाटप केव्हाच निश्चित झाले आहे. यातील चार जागा उद्धवसेनेला तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. यातील मुंबई उत्तर जागा नको असतानाही काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे. या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने काँग्रेसला हा मतदारसंघ नको होता. त्यामुळे इथे उमेदवार कोण, हा प्रश्न अजूनही काँग्रेसला सोडवता आलेला नाही. मुंबई उत्तर-मध्य या मतदारसंघातही उमेदवार कोण, याच्या शोधात काँग्रेस आहे. या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसची स्थिती सारखीच आहे. दोन्ही पक्षांना इथे उमेदवार कोण, हा प्रश्न सोडवता आलेला नाही.
महायुतीत ठाणे, पालघर कुणाच्या वाट्याला?
महायुतीत ठाणे आणि पालघरच्या जागेचा निर्णयही अद्याप प्रलंबित असून, भाजप आणि शिंदेसेना दोघेही या मतदारसंघासाठी आग्रही आहेत. त्यापुढे जाऊन इथल्या उमेदवारांचा प्रश्नही या पक्षांना सोडवायचा आहे.