भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:15 AM2024-05-17T09:15:06+5:302024-05-17T09:16:22+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंना स्थान काय असा खोचक सवाल शरद पवारांनी केला होता. त्यावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई - राज ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचा वारसा पुढे चालवत आहेत अशा शब्दात भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची पाठराखण केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंना स्थान काय असा खोचक सवाल करत शरद पवारांनी राज यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय पांडे म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचा वारसा हे राज ठाकरे पुढे घेऊन चाललेत. शरद पवारांनी आयुष्यभर जातीपातीचं राजकारण केलं. उद्धव ठाकरेंच्या हातातील भगवा काढून हिरवा दिला. अशा पवारांना राज ठाकरेंची महाराष्ट्रातील हिंदुत्वाची भूमिका ही समजणार नाही. महाराष्ट्राला जाती-पातींमध्ये वाटून सत्तेची पोळी भाजणाऱ्या शरद पवारांना आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्या राज ठाकरेंचं राजकारणातलं स्थान कळणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरे हे हिंदुहृहदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचा वारसा पुढे चालवत आहेत. शरद पवारांनी @uddhavthackeray च्या हातचा भगवा काढून त्यांच्या हाती हिरवा झेंडा दिला. महाराष्ट्राला जाती-पातींमध्ये वाटून सत्तेची पोळी भाजणाऱ्या @PawarSpeaks यांना आपल्या… pic.twitter.com/InsS0len3J
— Dr. Sanjay Pandey (Modi Ka Parivar) (@BJPSanjayPandey) May 16, 2024
काय म्हणाले होते शरद पवार?
ठाण्यातील महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली होती. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला पहिल्यांदा शरद पवारांनी सुरुवात केली. पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. त्यानंतर छगन भुजबळांना हाताशी धरून बाळासाहेबांची शिवसेना फोडली असा आरोप केला होता. त्यावर पत्रकारांनी नाशिकमध्ये शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी मोजक्याच शब्दात राज ठाकरेंना उत्तर दिलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचं नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही. मी ऐकलंय की, नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत, असंही शरद पवारांनी म्हटलं होते.
मराठीकडून हिंदुत्वाकडे
राज ठाकरेंनी त्यांच्या मनसे या पक्षाची स्थापना मराठीच्या मुद्द्यावरून केली होती. सुरुवातीपासून राज ठाकरे यांचा पक्ष मराठी भाषेसाठी आग्रही राहिला. त्यासाठी अनेकदा आंदोलने केली. मनसेच्या निशाण्यावर प्रामुख्याने उत्तर भारतीय राहिले. त्यामुळे मनसेवर बऱ्याचदा टीकाही झाली. मात्र २०१९ च्या निकालानंतर राज्यातील राजकारण बदललं. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपानं उद्धव ठाकरेंची कोंडी केली. अशातच राज ठाकरे यांनीही त्यांच्या मनसेची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने करत मराठीसोबतच हिंदुत्व असा नवा नारा देत पक्षाचा झेंडाही बदलला. उत्तर भारतीय यांच्याविरोधात भूमिका मवाळ केली. उत्तर भारतीय मंचावर जात पहिल्यांदा त्यांनी त्यांची भूमिका परप्रांतीयासमोर मांडली होती.