'बप्पा', 'मामां'ना तिकीट! बीड आणि भिवंडीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 05:54 PM2024-04-04T17:54:58+5:302024-04-04T18:05:21+5:30
Loksabha Election 2024: बीड आणि भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. भिवंडी मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वाद सुरू होता. परंतु या जागेवरही पवारांनी उमेदवार दिला आहे.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची दुसरी उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात बीड आणि भिवंडी मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे आहे. बीडमधून बजरंग सोनवणे तर भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
बीडमधून पंकजा मुंडे या महायुतीच्या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटातून आलेले बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बजरंग सोनवणे यांनी २०१९ मध्येही बीडची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना त्यांनी तगडी टक्कर दिली होती. परंतु यंदा याठिकाणचे गणित बदललं आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार गटात आल्याने बीडमध्ये पहिल्यांदाच धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्रित आलेत. त्यामुळे ही निवडणूक बजरंग सोनवणे यांच्यासाठी सोप्पी नाही. तर या मतदारसंघात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटेही इच्छुक आहेत. ज्योती मेटे यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. पण अखेर या मतदारसंघातून बजरंग सोनावणे यांना तिकीट देण्यात आले आहे.
विजयाचा निर्धार पक्का करून 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या साथीने ‘तुतारी’ला ललकारी देऊया, आणि दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडवूया.… pic.twitter.com/yMi96DJqSp
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 4, 2024
दुसरीकडे भिवंडी मतदारसंघावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू होती. भिवंडी मतदारसंघ काँग्रेसला सोडावा अशी आग्रही मागणी काँग्रेसनं केली होती. परंतु या जागेवर शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे याठिकाणी सुरेश म्हात्रे यांचा सामना महायुतीकडून भाजपाचे कपिल पाटील यांच्यासोबत होणार आहे.
शरद पवार गटानं आतापर्यंत घोषित केलेले ७ उमेदवार
वर्धा - अमर काळे
दिंडोरी - भास्कर भगरे
बारामती - सुप्रिया सुळे
शिरूर - अमोल कोल्हे
अहमदनगर - निलेश लंके
बीड - बजरंग सोनवणे
भिवंडी - सुरेश म्हात्रे