महायुतीत माढा अन् मविआमध्ये सांगलीचा तिढा; वरिष्ठ नेत्यांची का बनलीय डोकेदुखी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:53 PM2024-03-22T12:53:16+5:302024-03-22T12:59:27+5:30
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु सांगली जागेवरून शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेस यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळते. तर माढा जागेवर भाजपाने जाहीर केलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर यांच्यासारख्या महायुतीतल्याच नेत्यांनी विरोध केला आहे.
मुंबई - Sangli and Madha Seat controversy ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाने २० तर काँग्रेसनं ७ जागांसाठी उमेदवार यादी जाहीर केली आहे. परंतु अद्यापही महायुती असो वा महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला नाही. महायुतीत माढा आणि महाविकास आघाडीतसांगली जागेवरून तिढा निर्माण झाला आहे.
महायुतीने माढा येथून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आली आहे. मात्र या जागेवर धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. माळशिरसच्या मोहिते पाटील घराण्यातील धैर्यशील हे लोकसभा उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. परंतु भाजपाने रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर नाराज झालेले मोहिते पाटील समर्थकांनी गाठीभेटी, बैठकांचा सिलसिला सुरू केला. त्यात रामराजे निंबाळकर यांनीही भाजपा उमेदवारावर
नाराजी व्यक्त केली. त्यामुळे माढा इथं उमेदवार बदलणार की मोहिते पाटील समर्थक बंडखोरी करून निवडणुकीत ताकद दाखवून देणार हे पुढील काळात कळेल. परंतु सध्या या जागेवरून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
तर दुसरीकडे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं चर्चेत आले. त्यानंतर या मतदारसंघातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेत सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ती जागा टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी घेऊ पण सोडणार नाही असं घोषितच केले. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरची जागा मविआमध्ये ठाकरे गटाची होती. परंतु याठिकाणी सर्वमान्य उमेदवार म्हणून शाहू छत्रपतींनी लढण्याची विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन शाहूंनी काँग्रेसच्या पंचा चिन्हावर निवडणूक लढवू असं सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाची ही हक्काची जागा काँग्रेसला दिली. त्या बदल्यात काँग्रेसनं सांगलीची जागा ठाकरे गटाला द्यावी अशी मागणी झाली.
इतकेच नाही तर ठाकरे गटाने या जागेसाठी उमेदवार म्हणून पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणाही केली. मात्र सांगलीची जागा आमचीच आहे. त्यावर आमचे उमेदवार असतील असं काँग्रेस नेते सांगत आहे. तर या जागेवरून आता आम्ही दिल्लीत चर्चा करू. सांगली जागेवर तोडगा काढला जाईल. याठिकाणी चंद्रहार पाटील उभे राहतील असं वारंवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगतायेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात संघर्ष सुरू झाल्याचं चित्र उभं राहिलं आहे. त्यामुळे मविआच्या वरिष्ठ नेत्यांचीही सांगलीच्या जागेवरून डोकेदुखी वाढली आहे.