मी चंद्रकांत खैरेंचं काम करणार नाही, पण...; अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:37 PM2024-03-27T12:37:43+5:302024-03-27T12:40:47+5:30
Loksabha Election 2024: मी घाबरणारा माणूस नाही. करायचे तर उघडपणे करेन. गुपचूप धंदे करायचे हे मला आई बापाने शिकवलं नाही असंही दानवेंनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगर - Ambadas Danvey ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा गटाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात बहुचर्चित छत्रपती संभाजीनगर जागेवर चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी घोषित झाली आहे. या जागेवर अंबादास दानवेही इच्छुक होते. त्यामुळे खैरे-दानवे वाद उफाळून आला. त्यानंतर मातोश्रीवर या दोन्ही नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली. अखेर आज खैरेंची उमेदवारी जाहीर झाली. त्यावर आता अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, मी इच्छुक होतो, शिवसैनिकाचा इच्छुक राहण्याचा अधिकार आहे. २००९, २०१४ आणि २०१९ प्रत्येकवेळी मी इच्छुक होतो. जिल्हास्तरावर आणि गावपातळीवर माझा संपर्क आहे. निर्णय घेणे हा पक्षप्रमुखाचा अधिकार आहे. माझी शेवटची निवडणूक आहे असं खैरे म्हणाले, मला शेवटची संधी द्या असं म्हणाले त्यामुळे पक्षप्रमुखांनी संधी दिली. तिकीट मागण्याचा माझा अधिकार आहे. देणे न देणे पक्षाचा अधिकार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी घाबरणारा माणूस नाही. करायचे तर उघडपणे करेन. गुपचूप धंदे करायचे हे मला आई बापाने शिकवलं नाही. पराभव झाल्यावर दुसऱ्यावर खापर फोडले जाते. स्वत: काय दिवे लावले हे बोलत नाही. मी कुठल्याही व्यक्तीचे काम करत नाही. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि उद्धव ठाकरेंचे नेतृत्व यात मी काम करणार आहे. मी खैरेंचे नाही तर पक्षाचे काम करणार आहे. संघटनेत मतभेद असले पाहिजे. उमेदवारीची इच्छा असणे म्हणजे मतभेद नाहीत असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
दरम्यान, खैरे मागील निवडणुकीत २ हजार मतांनी पडले, पराभव झाल्यावर कोणावरही आरोप लावले जातात. नेमकं कुणामुळे पडले. या जिल्ह्यात २० लाख मतदार आहेत. एकाही मतदाराने समोर येऊन सांगावे. माझे आजही खुलं आव्हान आहे. अनोळखी मतदारानेही सांगावे. मी विरोधात मतदान करायला सांगितले. हे पाप मी कधीही करणार नाही असं सांगत दानवेंनी खैरेंच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले.