कोल्हापूरात महायुतीचा नवा डाव; शाहू छत्रपतींविरोधात समरजित घाटगे यांना उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 09:26 AM2024-03-09T09:26:45+5:302024-03-09T09:28:03+5:30
दिल्लीत गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील नेत्याची जी चर्चा झाली त्या हा प्रस्ताव पुढे आला.
समीर देशपांडे
कोल्हापूर - येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जागेवर महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती हे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. शाहू छत्रपती उभे राहणार असल्याने छत्रपती संभाजीराजे यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. कोल्हापूरची जागा महायुतीसाठी अवघड मानली जात आहे. त्यात आता भाजपाकडून धक्कादायक प्रस्ताव शिवसेनेपुढे ठेवला आहे.
शाहू छत्रपतींविरोधात छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील भाजपा नेते समरजित घाटगे यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा हा प्रस्ताव आहे. खासदार संजय मंडलिक यांना विधान परिषदेचे सदस्य करून त्यांना राज्यमंत्रिपदाचे आश्वासन देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातील एका नेत्याने या प्रस्तावाला दुजोरा दिला. पण खासदार मंडलिक यांनी मतदारसंघात मीच तगडा उमेदवार असल्याचे जाहीर केले.
दिल्लीत गुरुवारी संध्याकाळी अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील नेत्याची जी चर्चा झाली त्या हा प्रस्ताव पुढे आला. महाविकास आघाडीचे आमदार सतेज पाटील यांच्या आग्रहानुसार, शाहू छत्रपती यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असताना दुसरीकडे त्यांच्या तुलनेने मंडलिक यांची उमेदवारी दुबळी असल्याचे भाजपाचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्वेक्षणाची आकडेवारी समोर ठेवत कोणताही धोका पत्करण्याची भाजपाची तयारी नाही. त्यामुळे समरजित घाटगे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे आला आहे.
समरजित घाटगे यांनी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गेली ५ वर्ष राजकारण, समाजकारणात सक्रीय आहेत. राजघराण्याच्या जनक घराण्याचे वलय, तुलनेत नवा चेहरा आणि महायुतीची ताकद यामुळे घाटगे यांचे नाव पुढे आणण्यात आले आहे.
मुश्रीफ, महाडिकांवर जबाबदारी
समरजित घाटगे यांची उमेदवारी ठरली तर पालकमंत्री आणि घाटगे यांचे कट्टर विरोधक असलेले हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर प्रामुख्याने घाटगे यांच्या विजयाची जबाबदारी असेल. घाटगेंची उमेदवारी ठरवतानाच मुश्रीफदेखील आपले विधानसभेचे गणित सोडवूनच मग मान्यता देणार यात शंका नाही. घाटगे निवडून गेल्यानंतर तेच जर मुश्रीफांच्या प्रचार प्रारंभाला खासदार म्हणून उपस्थित राहणार असतील तर मुश्रीफ खरोखरच हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करणार यात शंका नाही.