PM नरेंद्र मोदींचा महादेव जानकरांना निरोप; देवेंद्र फडणवीसांनी भरसभेत सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 04:40 PM2024-04-01T16:40:35+5:302024-04-01T16:41:35+5:30
Loksabha Election 2024: परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी महायुतीची ताकद महादेव जानकरांमागे उभी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
परभणी - Devendra Fadnavis on Mahadev Jankar ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीकडून परभणी मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राज्याचे महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. या सभेत भाषणाच्या सुरुवातीला फडणवीसांनी सभेला उशीरा होण्यामागचं कारण सांगितलं. आज मुंबईत नरेंद्र मोदी आरबीआयच्या एका कार्यक्रमाला आले होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जेव्हा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विमानतळावर निरोप देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी निवडणुकीचा प्रचार कसा सुरू आहे असं विचारलं, आम्ही त्यांना चांगलं चाललंय सांगितलं, आता तुम्ही गेल्यानंतर आम्ही परभणीला चाललोय. महादेव जानकर यांचा अर्ज भरायला चाललोय. तेव्हा मोदी म्हणाले, जानकर यांना सांगा, १८ व्या लोकसभेत मी त्यांची वाट पाहत आहे. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. परभणीवासियांनाही माझा मेसेज द्या, जानकर यांना निवडून देण्याची तुमची जबाबदारी आहे. जानकर यांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवा असा निरोप फडणवीसांनी भाषणातून दिला.
तसेच महादेव जानकर हे मूर्ती लहान किर्ती महान आहे. ५ वर्ष माझ्यासोबत मंत्रिमंडळात काम केले. कुणकुण नाही, कुरबूर नाही. ५ वर्ष खात्यातून सर्वसामान्यांसाठी काम केले. ५ वर्षात एक रुपयाचा डागही महादेव जानकरांवर कुणी लावू शकले नाही. मंत्रिमंडळ गेल्यानंतर हा मंत्री फाटकाच राहिला, आजही फाटकेच राहिलेत म्हणून लोकांच्या मनात त्यांचे घर आहे. महादेव जानकरांची श्रीमंती ही सर्वसामान्य जनता आहे. वंचित, शोषित जनता ही महादेव जानकरांची कमाई आहे असं फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. तेव्हा महादेव जानकरांना उमेदवारी मिळावी असं मी अजितदादांना सांगितले. त्यावेळी तात्काळ दादांनी विटेकरांना बोलावून ही जागा जानकरांना दिली पाहिजे असं सांगितले. त्यावर राजेश विटेकर यांनीही ती मान्य केले. महायुतीची ताकद आम्ही तयार केलीय. मागच्या निवडणुकीत महाराष्ट्राने ४१ खासदार मोदींच्या झोळीत टाकले. तो रेकॉर्ड आम्ही मोडणार असून त्यापेक्षा जास्त खासदार आम्ही पाठवणार आहोत. या खासदारांमध्ये पंकजा मुंडेंसोबत महादेव जानकर हेदेखील असणार आहेत असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.