संजय राऊतांचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर; "चर्चा माझ्याशी नव्हती तर मविआसोबत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:05 PM2024-03-29T17:05:11+5:302024-03-29T17:41:54+5:30
Loksabha Election 2024: संजय राऊतांनी पाठित खंजीर खुपसला असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यानंतर आज पुन्हा आंबेडकरांनी राऊतांवर निशाणा साधला. त्यानंतर आता संजय राऊतांनीही प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedkar ( Marathi News ) महाविकास आघाडीच्या चर्चेत स्वत: शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात असे प्रमुख लोक चर्चा करत होते. मी कुठेच नव्हतो. वंचित बहुजन आघाडीला पहिल्यापासून सन्मानानेच वागवले. वंचितला ४ जागांचा प्रस्ताव होता. बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर करत नाही. अकोल्यासह ३ जागांचा प्रस्ताव होता. आमची विद्यमान रामटेकची जागाही द्यायला तयार होतो. काँग्रेसकडून चांगली जागा देण्याची तयारी होती. चर्चा माझी आणि प्रकाश आंबेडकरांची नव्हती. चर्चा महाविकास आघाडीशी होती असं प्रत्युत्तर संजय राऊतांनीप्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, जे संविधान संपवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कुणी वागू नये या मताचे आम्ही आहोत. ४ जागांचा प्रस्ताव होता. चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात झाली. बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असायला हवी. यात खोटे काय आहे? किंबहुना वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती आधीच झालेली आहे. त्यात उद्धव ठाकरेच होते असं त्यांनी सांगितले.
तर बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यात आहेत. रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता. शिवसेना त्या जागेचा त्याग करायला तयार होती. प्रकाश आंबेडकर मोठे नेते, आमची खेळीमेळीत चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावेत यासाठी उद्धव ठाकरे-शरद पवार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेत. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनीही प्रयत्न केलेत. त्यामुळे महाविकास आघाडीतले कुणी खोटं बोलतंय हे वाटत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, अकोल्याची जागा आमची नाहीच, मग त्यावर आम्ही कशाला चर्चा करू, जागावाटपावर कधीही स्वतंत्र चर्चा झाली नाही. सिल्व्हर ओक, मातोश्रीवर कधीही जागावाटपावर चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील समन्वयावर चर्चा झाली आहे. देशातील जनतेने ठरवलं आहे. लोकशाही आणि संविधान यांच्याविरोधात जी भूमिका घेतायेत त्यांच्या पाठिशी उभं राहायचं नाही. ३ एप्रिलला मविआची पत्रकार परिषद आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील असंही संजय राऊत यांनी सांगितले.
काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?
महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत. मविआकडून तीन जागांपलीकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.