कुणी पितात भरपूर पाणी, तर कुणी करतात योगासने; उन्हात उमेदवारांची घरोघरी पायपीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 10:36 AM2024-04-21T10:36:37+5:302024-04-21T10:37:01+5:30
तापमानाच्या वाढत्या पाऱ्याने उमेदवार, नेत्यांची त्रेधातिरपीट
विश्वास मोरे
पिंपरी (जि. पुणे) : लोकसभा प्रचाराचा आणि उन्हाचाही पारा वाढत आहे. मावळ मतदारसंघातील तापमान तर ४२ अंशांवर पोहोचले आहे. सकाळपासून घामाच्या धारा वाहत असताना दिवसभर उत्साह टिकवण्यासाठी, न थकता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते आटापिटा करताना आरोग्याचीही विशेष काळजी घेत आहेत.
प्रचारादरम्यान पाणी भरपूर पितोय
मी पिंपरी गावात राहतो. निवडणुकीच्या रणधुमाळीतही दररोज साडेसहा वाजता उठतो. त्यानंतर घरातच व्यायाम करतो. वर्तमानपत्रांचे वाचन करून सकाळी नऊला नाष्टा करतो. त्यानंतर नऊ ते दुपारी दीडपर्यंत प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका होतात. उन्हाळा असल्यामुळे भरपूर पाणी पिण्यावर भर देतो. दुपारी दीडनंतर जेवण होते. पुन्हा चारपर्यंत बैठका चालतात. रात्री दहापर्यंत प्रचाराचे काम सुरू असते.
- संजोग वाघेरे, महाविकास आघाडीचे उमेदवार
योगा-प्राणायाम आणि जिममध्ये व्यायाम
दररोज सकाळी सहाला उठल्यानंतर योगा-प्राणायाम, व्यायाम करते. तसेच, जिमलाही जाते. त्यानंतर साडेनऊ वाजता नाश्ता आणि घरातील व्यक्तींशी संवाद होतो. वर्तमानपत्रांचे वाचन होते. संपर्क कार्यालयातील बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद होतो. दुपारी दोन वाजता जेवण ठरलेलेच! त्यानंतर पुन्हा भेटी, बैठकामध्ये सहभाग. रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास प्रचार संपवून आल्यानंतर जेवण करते.
- अश्विनी जगताप, आमदार, भाजप, चिंचवड
झोप फक्त चार तासांची
सकाळी सहाला उठल्यानंतर ध्यानधारणा, सूर्यनमस्कार, योगा करतो. सकाळी साडेआठला घर सोडतो. मग भेटीगाठींवर भर असतो. तीन वाजता असेल तेथे जेवण करतो. त्यानंतर पुन्हा गावभेटी, कोपरा सभामध्ये सहभागी होऊन संवाद साधला जातो. रात्री दोन वाजता झोपतो. फक्त चार तासांची झोप होते. उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यावर भर देतो. - श्रीरंग बारणे, महायुतीचे उमेदवार