विकासाला विरोध म्हणजेच राजकारण असं उद्धव ठाकरे समजतात; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 06:43 AM2024-04-21T06:43:48+5:302024-04-21T06:44:38+5:30
काँग्रेसपेक्षा ठाकरेंकडून अल्पसंख्याकांचे अधिक लांगुलचालन
श्रीमंत माने/विकास मिश्र
नागपूर : उद्धव ठाकरेंना विकास हा विषयच समजत नाही. विकासाला विरोध म्हणजेच राजकारण, असे ते समजतात. त्याचप्रमाणे भाजपला विरोधाच्या नादात आता त्यांनी हिंदुत्व पूर्णपणे सोडले असून, ते अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करण्यात काँग्रेसच्याही पुढे गेले आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर फडणवीस हे शुक्रवारी रात्री उशिरा ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, समृद्धी महामार्ग, मुंबईचा कोस्टल रोड, अटल सेतू अशा विकास प्रकल्पांना उद्धव ठाकरे यांनी विरोध केला, मच्छीमारांना उचकावण्याचा अपयशी प्रयत्न केला. कामे पूर्ण झाल्यानंतर मात्र श्रेय घेण्यासाठी पुढे आले. नाणार येथील रिफायनरीला त्यांच्या विरोधामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आणि ते आता वाढवण बंदरालाही विरोध करीत आहेत. हा केवळ विरोधासाठी विरोध आहे.
आमच्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटले हा आरोप चुकीचा आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्यानुसार, पुत्रप्रेमामुळे आंधळे झालेले ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व इतरांचे पंख कापले, तर मुलीच्या राजकारणासाठी शरद पवारांनी अजितदादांना संधी दिली नाही. त्याला कंटाळूनच दोघांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजकारणात आम्ही साधूसंत बनण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे आम्ही त्या संधीचा लाभ घेतला इतकेच, असे ते म्हणाले.
ठाकरे व पवार हे ही बाब मान्य करीत नाहीत. उलट या मुद्द्याचा उपयोग काँग्रेसला हतोत्साहीत करण्यासाठी करतात. काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. सांगली, भिवंडी किंवा मुंबईतल्या हक्काच्या जागाही काँग्रेसला मिळाल्या नाही. ठाकरे अल्पसंख्याक लांगूलचालनाबाबत काँग्रेसशी स्पर्धा करीत आहेत. मराठी-मुस्लीम मतांच्या बळावर महायुतीला पराभूत करू शकू, अशा भ्रमात ते आहेत. मराठी मते आमच्याकडेही आहेत, हे ते विसरले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
कुरघोडी नव्हे मोठ्या भावाच्या भूमिकेत
महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे. ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मान्य आहे. आम्हा तिघांमध्ये समन्वय तसेच एकवाक्यता असल्याने महायुतीबद्दल विश्वासाचे वातावरण आहे. लोकसभेच्या जागावाटपात काही ठिकाणी थोडाबहुत पेच असला, तरी त्यामुळे राज्यभरात चुकीचा संदेश गेला नाही. बारामतीत आम्ही एकजुटीने लढत आहोत. माढात आमची लढाई स्वकीयांशीच आहे.
उत्तम जानकर मोहिते-पाटलांसोबत गेले तरी कार्यकर्ते सोबत येणार नाहीत. त्याचा फायदा महायुतीला होईल. महायुतीत मोजक्या जागांवर पेच आहे. तो आज-उद्या सुटेल. नाशिकचा पेच छगन भुजबळांनी माघार घेऊन सोडविला, असे फडणवीस म्हणाले.
देशभर पंतप्रधान मोदींची लाट
गेल्या दहा वर्षांमधील विविध आघाड्यांवरील सरकारची कामगिरी हाच विजयाचा मंत्र आहे. देशभर मोदी यांची लाट आहे. सर्वेक्षणांमध्ये ती सापडत नाही. विशेषत: सर्व्हेमध्ये महिलांची मते फारशी घेतली जात नाहीत आणि तिथेच मोदींचा प्रभाव अधिक आहे.
आदित्यला सीएम म्हणून तयार करेन अन् दिल्लीत जाईन असे फडणवीस म्हणाले होते!
देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की ते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतील आणि ते स्वत: दिल्लीत जातील; पण त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटे ठरवले, असा नवा दावा उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंबाबत आश्वस्त केल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ते म्हणाले, अडीच-अडीच वर्षांसाठी शिवसेना व भाजपाचा मुख्यमंत्री होईन, हे अमित शाहांसोबतच्या चर्चेत ठरले होते.