संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 01:55 PM2024-05-16T13:55:19+5:302024-05-16T14:16:31+5:30

Loksabha Election - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले असताना तपास यंत्रणांनी हेलिकॉप्टरमधून त्यांनी आणलेल्या बॅगांची तपासणी केली.

Loksabha Election - CM Eknath Shinde bags checked after Sanjay Raut allegations; What happened in Nashik? | संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?

संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?

नाशिक - CM Eknath Shinde Bags Check ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचाराला आता २ दिवस शिल्लक आहे. त्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाशिक दौऱ्यावर असून याठिकाणी शिंदे नाशिकमध्ये दाखल होताच निवडणूक तपास अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. नाशिक इथं मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पोहचताच तिथे ही तपासणी करण्यात आली. 

नुकतेच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. शिंदे हेलिकॉप्टरमधून पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात असा दावा राऊतांनी केला होता. त्यानंतर आज नाशिक येथे तपास यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी नेहमी बॅगा घेऊन येतो, बॅगांमध्ये कपडे असतात. चोराच्या मनात चांदणे, जे लोक रात्री बेरात्री लपून छपून काम करतात ते आरोप करतात. हा एकनाथ शिंदे उघडपणे सगळे करतो. नाशिकच्या स्टँडिंग कमिटीतून काय काय कुठे गेले याचा खुलासा लवकर होईल असा टोला विरोधकांच्या आरोपावर लावला.

तर नाशिकमध्ये त्यादिवशी मुख्यमंत्री आले होते, तेव्हा बॅगा का तपासल्या नाहीत, आज आरोप केल्यानंतर बॅगा तपसाल्या. त्या बॅगेत काय घेऊन जाणार आहेत का? ही नौटंकी आहे. तपास यंत्रणांनी त्यादिवशी बॅगा का तपासल्या नाहीत याचे उत्तर द्यावे. त्या बॅगा आल्यापासून कुठे गेल्यापर्यंत तपासणी करावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून सर्च करावे. हे सर्व दाखवण्यासाठी, शोबाजी करण्यासाठी केलंय. ही तपासणी केवळ स्टंटबाजी आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.निवडणुकीच्या काळात एअरपोर्टवरून असो, वा खासगी विमानातून अशाप्रकारे तपासणी करावी लागते हा नियम आहे. यातून देशाच्या पंतप्रधानाला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि कुणीही असो त्यांना सूट दिली जात नाही. बॅगा तपासल्याच पाहिजेत असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत?

नाशिक आणि कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिसांना उचलताना नाकीनऊ येतील एवढ्या वजनाच्या बॅगा आणल्या होत्या, त्या बॅगा कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, कुठे त्यातील पैसे वाटले गेले याचे व्हिडीओ लवकरच बाहेर आणू असा दावा राऊत यांनी केला होता. महाराष्ट्रातल्या ज्या भागात निवडणुका आहेत, संभाजीनगर असेल महत्त्वाचा पुणे आहे इतर अनेक ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचे वाटप, पैशाची आवक जावक ही स्पष्ट दिसत आहे. नाशिकमध्ये  दोन तासासाठी मुख्यमंत्री आले आणि जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत. 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या. त्या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटत गेले, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकर देत आहोत, असे राऊत यांनी जाहीर केले होते. 

Web Title: Loksabha Election - CM Eknath Shinde bags checked after Sanjay Raut allegations; What happened in Nashik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.