नारायण राणे १३९ कोटींचे मालक, डोक्यावर २९ कोटींचे कर्ज; तर विनायक राऊतांकडे...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 08:19 AM2024-04-22T08:19:25+5:302024-04-22T08:20:59+5:30
केंद्रीय मंत्र्यांकडे नऊ किलो सोने, तर २८ किलो चांदी, नारायण राणे, त्यांची पत्नी नीलम राणे आणि एकत्रित कुटुंबांची मिळून ५४ कोटी ३७ लाख ९६ हजार ४९६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता, तसेच विविध गुंतवणूक अशी मिळून सुमारे १३९ कोटींची मालमत्ता असून, १८ ते ७५ लाख रुपयांच्या किमतीची आठ वाहने आहेत, तर २९ कोटींचे कर्ज आहे.
नारायण राणे यांची जंगम मालमत्ता १२ कोटी ४७ लाख ८६ हजार २८१, तर पत्नी नीलम यांच्या नावे दुप्पट म्हणजेच २४ कोटी १४ लाख ८३ हजार ३०८ रुपयांची मालमत्ता आहे. काैटुंबिक एकत्र मालमत्ता मिळून एकूण ५४ कोटी ४९ लाख ४२ हजार ७३० रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. यात ९,०३३.२५ ग्रॅम सोने, २८ किलो चांदी आणि २,१३६ हिऱ्यांचे सेट आहेत. नारायण राणे, त्यांची पत्नी नीलम राणे आणि एकत्रित कुटुंबांची मिळून ५४ कोटी ३७ लाख ९६ हजार ४९६ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. विविध बँका, शेअर्स, बाँड याद्वारे ३० कोटी ९ लाख ४६ हजार ८०७ रुपयांची गुंतवणूक आहे.
राणे कुटुंबाकडे साडेतेरा कोटींचे दागिने
राणे कुटुंबाचे एकत्र मिळून ९०३३.२५ ग्रॅम सोने (किंमत ६ कोटी २६ लाख ४० हजार ०८६), २८ किलो चांदी (किंमत २१ लाख ७२ हजार ८०० रुपये) आणि २१३६.५५ इतके जवाहिर (किंमत ६ कोटी ९५ लाख २४ हजार २३१ रुपये) मिळून एकूण १३ कोटी ४३ लाख ३७ हजार ११७ कोटींचे दागिने आहेत.
कर्जदारही आहे राणे दाम्पत्य : राणे दाम्पत्याच्या नावावर २९ कोटी १२ लाख ४३ हजार २५३ रुपये कर्ज आहे.
विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील उद्धवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्याकडे स्थावर आणि जंगम मिळून एकूण ४ कोटी ९० लाख ३४ हजार ८२९ रुपयांची मालमत्ता असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. त्यांची पत्नी शामल या जंगम मालमत्तेत त्यांच्यापेक्षा १६ लाख ७३ हजारांनी श्रीमंत आहेत. गेल्या वेळी राऊत यांची स्थावर मालमत्ता ३ कोटी ८७ लाख एवढी होती. यावेळी त्यांच्या जंगम मालमत्तेत ३८ लाखांची वाढ झाली आहे.