भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 05:26 PM2024-06-06T17:26:58+5:302024-06-06T17:27:51+5:30
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला असून काही ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मुंबई - Narayan Rane Meet Raj Thackeray ( Marathi News ) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. याठिकाणी मविआचे उमेदवार विनायक राऊत यांचा ४७ हजारांच्या मताधिक्याने पराभव झाला आहे. निकालानंतर आज नारायण राणे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी येऊन राज ठाकरेंची भेट घेत त्यांचे आभार मानले.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यात नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी पहिलीच सभा कोकणात घेतली होती. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या संबंध चांगले असल्याने राज ठाकरे कणकवली आले होते. त्याठिकाणी राज ठाकरेंनी राणेंसाठी मते मागितली होती. या निवडणुकीत मनसेचे कार्यकर्तेही महायुतीच्या प्रचारात सक्रीयपणे उतरले होते. त्यामुळे राणे यांनी आज राज ठाकरेंची भेट त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा आमदार नितेश राणे हेदेखील उपस्थित होते.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार मा.श्री. नारायण राणे यांनी सन्माननीय राजसाहेबांची 'शिवतीर्थ' येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रं. pic.twitter.com/H5oLVtzjej
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 6, 2024
राज ठाकरेंनी जिथं सभा घेतल्या तिथं महायुती जिंकली
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज ठाकरे महायुतीच्या प्रचारात कधी उतरणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी तीन प्रचारसभा घेतल्या. त्यातील पहिली सभा रत्नागिरी-सिंधुदुर्ग, त्यानंतर पुणे आणि ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणे, ठाण्यात नरेश म्हस्के, कल्याण-डोंबिवलीसाठी श्रीकांत शिंदे आणि पुण्यातून मुरलीधर मोहळ या उमेदवारांसाठी राज ठाकरे मैदानात उतरले होते. या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार जिंकले आहेत.
ठाण्याच्या खासदारानेही मानले आभार
कृतज्ञ... अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला. मी विद्यार्थीदशेत असल्यापासून ज्या संघटनेला वाहून घेतलं. त्या माझ्या चार अक्षरी जगाला, शिवसेनेला पहिला मानाचा मुजरा करतो. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाशिवाय ही लढाई लढणं शक्य नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली. राज साहेब ठाकरे यांनी आमच्यासाठी सभा घेतली तेव्हाच आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला असं सांगत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंचे आभार मानले होते.