श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 06:00 PM2024-06-08T18:00:07+5:302024-06-08T18:01:16+5:30

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने ७ खासदार निवडून आणले असून आता एनडीएच्या सरकारमध्ये त्यांना वाट्याला १ मंत्रिपद येणार असल्याची चर्चा आहे.

Loksabha Election Result - Give Ministerial post to Shrikant Shinde, Shiv Sena MLAs, MPs demand; CM Eknath Shinde will take decision | श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार

श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद द्या, शिवसेना आमदार, खासदारांची मागणी; मुख्यमंत्री निर्णय घेणार

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेना पक्षाला मिळणारे मंत्रिपद डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्यात यावे अशी इच्छा शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार असल्याची माहिती शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. नवी दिल्ली येथे शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एनडीए’चे मुख्य नेते म्हणून निवड केली होती. रविवारी ९ जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार आहे. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला मंत्रिपद मिळणार आहे. हे मंत्रिपद कल्याणमधून विजयाची हॅट्ट्रिक करणारे डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्याची इच्छा शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. श्रीकांत शिंदे हे एक सुशिक्षित, कार्यक्षम आणि संसद रत्न खासदार आहेत असं त्यांनी म्हटलं. 

तसेच शिवसेनेच्या बहुसंख्य आमदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्याची भावना व्यक्त केली आहे. या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार आहे. श्रीकांत शिंदे यांना यापूर्वी संसदरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांचा संसदेतील अनुभव आणि पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेली मेहनत पाहता त्यांना मंत्रिपद देण्यात यावे असं शिवसेनेतील आमदार, नगरसेवकांचं मत आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.     

उबाठाचे सहा खासदार शिवसेनेच्या संपर्कात 

दरम्यान, उबाठाचे ९ पैकी ६ खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार नरेश म्हस्के यांनी केला. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं त्यांनी सांगितले. मशिदींतून फतवे काढून उबाठाला एकगठ्ठा मतदान झाले, यासाठी लाखो रुपये वाटले. उबाठाचे उमेदवार जिथून निवडून आले तिथला मूळ मराठी मतदार मात्र त्यांच्यापासून दूर गेला. मुंबई, ठाणे, कल्याण या मतदार संघांत शिवसेनेचे उमेदवार ७ लाखांवर मते मिळवत विजयी झाले असं खासदार म्हस्के यांनी सांगितले. उबाठाने शिवसेनेच्या मूळ तत्वांशी व विचारांशी फारकत घेतल्याचे मतदारांच्या लक्षात आले असून त्यांच्यात पश्चातापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे उबाठाच्या आमदार आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. शिवसेनेवर सतत भूंकण्यासाठी उबाठाने एकाची नेमणूक केली असल्याचा टोला म्हस्केंनी राऊतांना लगावला. 

Web Title: Loksabha Election Result - Give Ministerial post to Shrikant Shinde, Shiv Sena MLAs, MPs demand; CM Eknath Shinde will take decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.