कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा मोठा विजय; २ लाखांच्या मताधिक्याने ठाकरेंचा उमेदवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:28 PM2024-06-04T16:28:29+5:302024-06-04T16:30:45+5:30

loksabha Election Result - कल्याण मतदारसंघात महायुतीनं दमदार विजय मिळवला असून याठिकाणी मविआ उमेदवाराचा पराभव झाला आहे. 

loksabha Election result- Srikanth Shinde big win in Kalyan; Uddhav Thackeray candidate lost by a margin of 2 lakh votes | कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा मोठा विजय; २ लाखांच्या मताधिक्याने ठाकरेंचा उमेदवार पराभूत

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा मोठा विजय; २ लाखांच्या मताधिक्याने ठाकरेंचा उमेदवार पराभूत

कल्याण - ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे निवडणुकीत उभे होते. या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात  श्रीकांत शिंदे यांना ४ लाख ३९ हजार ९६६ मते पडली तर मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना २ लाख ३४ हजार ४८८ मते पडली. या मतदारसंघात जवळपास २ लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत. ठाणे आणि कल्याण या मतदारसंघाची लढाई प्रतिष्ठेची होती. कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदेंचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले होते. परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाजी मारल्याचं दिसून येते. 

कल्याण लोकसभा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा चार टक्के जास्त म्हणजे ५०.१२ टक्के मतदान झालं होतं. या ठिकाणी २० लाख ८२  हजार २२१ मतदारांपैकी १० लाख ४३ हजार ६१० मतदारांनी मतदान केलं होतं. महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर मतदारसंघांच्या तुलनेत मुंब्रा-कळवा परिसरात झालेले मतदान महायुतीला चिंतेत टाकणारे होते.  कळवा मुंब्रा येथून २ लाख १६ हजार १५९, तर कल्याण ग्रामीणमधून २ लाख ३१ हजार १६२ आणि कल्याण पूर्वमधून १ लाख ५६ हजार २३५ मतदारांनी मतदान केले आहे. ही सर्वाधिक मते असून, डोंबिवलीत १ लाख ४२ हजार १४२, उल्हानसगर १ लाख ३१ हजार ५०५, तर अंबरनाथमध्ये १ लाख ६६ हजार ४०७ मतदान झाले होते. त्यात आज निकालात श्रीकांत शिंदे यांना सुरुवातीपासून आघाडी मिळाली. शेवटच्या टप्प्यापर्यंत ही आघाडी २ लाखांच्यावर पोहचली. 
 
दरम्यान, एकूण मतदानाच्या टक्केवारीनुसार, ६०.२९ टक्के मते श्रीकांत शिंदे यांच्या पारड्यात पडली तर वैशाली दरेकर यांना ३२.१७ टक्के मते मिळाली. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनेही शाहबुद्दीन शेख सुलेमानी यांना तिकीट दिले होते. त्यांना १५ हजार ४६० मते पडली. 

Web Title: loksabha Election result- Srikanth Shinde big win in Kalyan; Uddhav Thackeray candidate lost by a margin of 2 lakh votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.