मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 04:26 PM2024-06-05T16:26:06+5:302024-06-05T16:27:04+5:30

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता दिल्लीत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यात एनडीए आणि इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक संध्याकाळी होणार आहे.

loksabha Election Result- Uddhav Thackeray will not go to INDIA Alliance meeting in Delhi, what is happening? | मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?

मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देशात एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून पुढील सरकार स्थापनेच्या रणनीतीसाठी आज दिल्लीत मोठ्या हालचाली होत आहेत. दिल्लीत आज इंडिया आघाडी आणि एनडीएची बैठक होणार आहे. यात इंडिया आघाडीच्या बैठकीला सर्व विरोधी पक्षाचे प्रमुख नेते हजर राहतील. परंतु उद्धव ठाकरे या बैठकीला जाणार नाहीत अशी बातमी समोर आली आहे.

राज्यात महाविकास आघाडीनं महायुतीला जोरदार धक्का देत ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. देशातही काँग्रेसची चांगली कामगिरी राहिली. इंडिया आघाडीनं पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नसून त्यांच्या ऐवजी संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत हे बैठकीला हजर असणार आहेत. इंडिया आघाडीने केंद्रात सत्ता स्थापनेचा दावा केला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. त्यासाठी ते तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करत आहेत. त्याबाबत सकारात्मक आणि ठोस काही घडामोडी घडल्या तरच उद्धव ठाकरे दिल्लीत जातील असं सूत्रांच्या हवाल्यानं बोललं जातं. इंडियन एक्सप्रेस या दैनिकानं ही बातमी दिलीय.

निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी ममता बॅनर्जींसह अनेकांशी फोनवरून संवाद साधला. विरोधी पक्ष आणि भाजपामुळे त्रस्त असलेल्या नेत्यांना एकत्र करून सरकार स्थापनेचा दावा इंडिया आघाडी करण्यासाठी ठाकरे उत्सुक आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीला आमचे प्रतिनिधी उपस्थित राहतील आणि जर चर्चा सकारात्मक झाली तरच उद्धव ठाकरे दिल्लीला जातील असं ठाकरे गटाच्या एका नेत्याने सांगितले. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

इंडिया आघाडीची बैठक होण्याआधी निर्णय काय सांगणार. पण इंडिया आघाडीने सत्तास्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर दिल्लीला जाईन. कारण आमचे जिंकलेले मुंबई बाहेरचे उमेदवार उद्या मुंबईत भेटायला येतील. त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सुरुवातीला संजय राऊत आणि मुंबईतील खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे पुढे जातील.  तर दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मी दिल्लीला पोहोचेन, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत दिली होती.  

Web Title: loksabha Election Result- Uddhav Thackeray will not go to INDIA Alliance meeting in Delhi, what is happening?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.