रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
By संजय पाठक | Published: May 18, 2024 03:44 PM2024-05-18T15:44:07+5:302024-05-18T15:44:50+5:30
नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये आले होते
नाशिक- लोकसभा निवडणूकीत मी महायुतीकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र, शिर्डीला सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी
देण्यात आल्याने ही जागा देण्यात आली नाही. मात्र, मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे, आणि यावेळी मला कॅबीनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी दिल्याचा दावा रिपाई आठवले गटाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. लोकसभा निवडणूकीसाठी रिपाईला दोन जागा मिळाव्या अशी मी मागणी केली होती. कारण दोन जागांमुळे मला मिळणारी मते राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यास उपयुक्त ठरली असती, मात्र, दोन्ही जागा नाकारल्या, परंतु राज्यसभेत मला संधी मिळेलच आणि यंदा मला कॅबीनेट मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे ते म्हणाले.
यंदा लाेकसभा निवडणूकीत एनडीएला अत्यंत अनुकूल वातावरण असून चारशे जागा मिळतीलच असे ते म्हणाले. महाराष्ट्रात काहीही झाले तरी आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामीळनाडू येथे प्रथमच भाजपाला अधिक जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला.
संघानेच मेादी यांना मोठे केले...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेले कथित वादग्रस्त विधान त्यांनी केलेच नसावे असे मत रामदास आठवले म्हणाले. संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठबळच दिले आहे, त्यामुळे नड्डा असे बाेलले असतील असे वाटत नाही असे आठवले म्हणाले.