महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 02:47 PM2024-05-16T14:47:09+5:302024-05-16T14:50:21+5:30

Loksabha Election - शेतकरी आत्महत्या आणि पाण्याच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी शरद पवार गटानं भाजपावर निशाणा साधला.

Loksabha Election - Suicide of 267 farmers within a month; Jayant Patil Target on government | महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं

महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं

मुंबई - Jayant Patil on Farmers ( Marathi News )  मराठवाड्यात मागील एप्रिल महिन्यात २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागात ४ सभा घेतल्या. तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचं बारीक लक्ष होतं. मतांची बेरीज वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा कमी करण्यासाठी का मागे पडलात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

तसेच काळजीवाहू सरकारलाच शेतकऱ्यांची पडली नाही म्हणून काळजी वाटते. महाराष्ट्रात एकही आत्महत्या घडू देणार नाही असा शब्द देऊन, शब्द पूर्ण न करणारे निवडणुकीच्या काळात दिलेले शब्द पूर्ण करतील याची काय गॅरंटी? असा टोलाही जयंत पाटलांनी लगावला आहे.

नाशिकमध्ये शरद पवारांचा मोदींवर निशाणा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण मी ऐकलं,  नेहमीप्रमाणे  त्यांनी भाषण केले. देशाचा कोणीही प्रमुख असो, त्याची पहिली जबाबदारी ही  आहे की देशातील सर्व घटक, जात-धर्म-भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता  ते एकसंघ कसे ठेवता येईल. पण हे पहिले प्रधानमंत्री आहेत ते देशाच्या विविध  जाती धर्मातील लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी आपली शक्ती  वापरण्याऐवजी ते यामध्ये अंतर कसे वाढेल याचा विचार करतात असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आज या  देशात, राज्यात, शहरात, जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. नार-पारचे पाणी असो, जे गुजरात जाते ते थांबवून इथे कसे घेता येईल. त्याचा  अभ्यास झालाय. ते पाणी अडवून जिल्ह्यात घेऊ शकलो, तर जिल्ह्यातील पाण्याची  गरज सहज भागेल. एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील पाण्याची गरज भागून जर काही  पाणी शिल्लक राहिले तर नगरचाही विचार करता येईल, अशा प्रकारची योजना खऱ्या  अर्थाने तातडीने करण्याची गरज आहे. पण मला समजत नाही. गुजरातला पाणी जात असेल तर या राज्यातील राज्यकर्त्यांनी बघ्याची भूमिका घेण्याचे कारण नाही. कदाचित नेतृत्व आज ज्यांच्याकडे आहे त्यांच्या काही सूचना असल्या तर मला माहिती नाही. पण अशा सूचना असतील तर नाशिक आणि महाराष्ट्रावर हा अन्याय  आहे असा आरोप शरद पवारांनी केला.

Web Title: Loksabha Election - Suicide of 267 farmers within a month; Jayant Patil Target on government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.