उद्धव ठाकरे अडचणीत, 'त्या' दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चौकशी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 01:41 PM2024-05-31T13:41:09+5:302024-05-31T13:41:46+5:30
loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदानादिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपासह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर भाजपानं याबाबत आयोगाकडे तक्रार केली होती.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह इतर भागात मतदान पार पडलं. यावेळी मुंबईतल्या मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र होतं. मतदानासाठी होत असलेली दिरंगाई आणि मतदारांना मिळणाऱ्या असुविधा यामुळे उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह भाजपावर निशाणा साधला होता. या पत्रकार परिषदेबद्दल भाजपानं निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली होती.
आता निवडणूक आयोगनं या तक्रारीची दखल घेतली आहे. मुंबईतल्या निवडणुकीदिवशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात आली असून त्यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर अनेक गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
काय होता आशिष शेलार यांचा आरोप?
निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला टार्गेट केले होते. मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे कशी काय पत्रकार परिषद घेऊ शकतात असा सवाल करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरेंनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत ठाकरेंची पत्रकार परिषद खोटी आणि दिशाभूल करणारी असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेलारांनी केली होती.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
निवडणूक आयोगा हा भाजपाचा घरगडी असून त्यांच्याकडून पक्षपातीपणा करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाणुनबुजून अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जातोय. मतदारांनी मतदानाला उतरू नये. बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावं यासाठी हा सरकारचा डाव आहे. ठाकरे गटाला भरघोस प्रतिसाद मिळत असलेल्या वसाहतींमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून दिरंगाई करण्यात आली. तसेच वेगवेगळे पुरावे मागून मतदारांचा छळ केला गेला. पराभवाच्या भीतीने पछाडलेल्या भाजपने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विरोधकांच्या मतपेटी क्षेत्रात कमी मतदानाचा खेळ खेळला असा आरोप उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपावर केला होता.