निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:50 AM2024-05-13T10:50:57+5:302024-05-13T10:51:50+5:30
Loksabha Election - संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे वारसदार, हिंदुत्व सोडल्याचा आरोप यावरून भाजपावर हल्लाबोल केला.
मुंबई - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) नरेंद्र मोदींच्या मनात संभ्रम आहे. मी एका भयानक अनुभवातून गेलो. मी आजारी असताना त्यांनी किती फोन केले हे खरे खोटे करायची गरज नाही. पण याच काळात तुमचे चेलेचपाटे रात्रीची हुडी घालून माझा पक्ष तुमच्या परवानगीशिवाय फोडत होते का? ज्या शिवसेनेने, हिंदुहृदयसम्राटाच्या मुलाने तुम्हाला दोनदा पाठिंबा दिला, त्याला तुम्ही नकली म्हणायला लागला हे कुठले प्रेम, हे चायनीज प्रेम आहे का? तुमच्या प्रेमाची व्याख्या काय? विश्वासघातकीवर प्रेम करू शकत नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत पुन्हा जाण्यास नकार दिला.
संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा आता भाकड कथा सांगत आहेत. देवेंद्र फडणवीसांना मी फोन केला नव्हता. नासलेले आंबे मला माझ्या पेटीत नको होते. नाहीतर यांच्या शेपट्या पकडून मी रोखू शकलो असतो. मी माझ्या महाराष्ट्राची, देशाची लढाई लढतोय, लोकांचा आशीर्वाद मला हवाय. ही लढाई माझी नव्हे जनतेची आहे. महाराष्ट्र संपवला जातोय, मला महाराष्ट्र संपवून देणार नाही. मी स्वाभिमानाची लढाई लढतोय. मी महाराष्ट्राच्या अभिमानाचं, स्वाभिमानाचं, अस्मितेचं वेगळे मंदिर बांधतोय. त्यामुळे आता मला कुठल्या खिडकी, दारांची गरज नाही असं ठाकरेंनी सांगितले.
तसेच २०१४ साली मोदींच्या पंतप्रधानपदाला भाजपाव्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप शिवसेनेने केले. आता ते मला संपवायला निघालेत. मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतायेत हे सत्य आहे की स्वप्न हे कळत नव्हते. त्यानंतर जूनमध्ये शपथविधी झाल्यानंतर ऑक्टोबरच्या निवडणुकीत आम्ही काय केले होते. त्यामुळे भाजपाने आमच्यासोबतची युती तोडली. त्यावेळी तर आम्ही काँग्रेससोबत गेलो नव्हतो. तेव्हा औरंगजेब फॅन क्लबमध्ये मी नव्हतो. मग २०१४ साली युती का तोडली? एकनाथ खडसेंनी मला संध्याकाळी फोन करून आता युती नाही, वरिष्ठांनी निर्णय घेतला युती तोडण्याचा ते कळवलं. मग तेव्हा शेवटच्या क्षणी युती का तोडली? फसवलेले गेल्याची भावना आजसुद्धा आहे. विश्वासघाताची मदत मी करू शकत नाही. सत्तेसाठी आम्ही तडफडत असतो तर जेव्हा भाजपाचे अख्ख्या देशात २ खासदार होते. देशाच्या राजकारणात शिवसेना-भाजपा अस्पृश्य होती. २ खासदार असलेल्या पक्षासोबत युती केली होती. ही वैचारिक युती होती. पार्ल्याची पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदुत्वावर लढवली तेव्हा तुम्ही आमच्यासोबत आलात असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.
दरम्यान, महाराष्ट्र लेचापेचा नाही. भोळा-भाबडा आहे. महाराष्ट्रात मर्दांची कमी नाही. जर कुणी प्रेमाने आलिंगन दिले तर आलिंगन देतो. जर पाठित वार केला तर वाघनखे काढतो. ती वाघनखे जनतेच्या रुपाने महाराष्ट्रात दिसतायेत. महाराष्ट्राने वाघनखे काढली आहेत. माझं खुलं आव्हान आहे, महाराष्ट्रातील तमाम जनतेला बोलावू, पोलीस संरक्षण न घेता मी जनतेच्या समोर उभा राहतो. निवडणूक आयोगात धाडस असेल तर त्यांनी आणि या लबाडांनी यावे. जनतेसमोर सांगावे हा पक्ष कोणाचा, जो निर्णय देतील तो मी मान्य करायला तयार आहे. हे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर काम त्यांनी केले आहे असं आव्हान उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिले.
मोदी-शाहांना महाराष्ट्राबद्दल आकस
इतिहासात मागे गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांची सूरत लुटली होती. तिथपासूनचा राग मोदी-शाहांच्या मनात आहे का? संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, त्यात माझे आजोबा पहिल्या ५ नेत्यांमधील एक होते. तेव्हा शिवसेना नव्हती, माझे वडील व्यंगचित्रकार होते, संयुक्त महाराष्ट्र लढा पेटला होता. तेव्हा मोरारजी देसाई ते कुठून आले होते सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी पोलिसांना गोळ्या मारण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्राबाबत इतका आकस दिसताना आता सगळे लोटांगणवीर झालेत. तो राग आता काढतायेत. महाराष्ट्राबद्दल प्रेम उतू जातंय दाखवताय, महाराष्ट्रावर जेव्हा संकट आले, तेव्हा मोदी-शाह महाराष्ट्रात आले नाही. एका पैशाने मदत केली नाही. महाराष्ट्र बदनाम करायचा, नेतृत्व बदनाम करायचे. पक्ष फोडायचे, महाराष्ट्र एवढा वाईट आहे असं केल्यानंतर उद्योग येऊच नये. महाराष्ट्राच्या डोक्यावर आपण बसायचे. मुंबईकडून सगळं हिरावून गुजरातला घेऊन जायचे. वांद्रे येथील जागा बुलेट ट्रेनला दिली. त्याचा मराठी माणसाला फायदा काय? गुजरात आणि देश यात मोदी भिंत उभी करतायेत. माझा गुजरातबद्दल आकस नाही. मुंबईला भिकेला लावण्याचं काम या लोकांकडून केले जात आहे. मुंबई लुटली जावी यासाठीच शिवसेना फोडली. लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार येणार, मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव परत आणणार असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांचे विचार तुम्ही मला शिकवणार का?
बाळासाहेबांची शिवसेना बोलण्याआधी भाजपानं बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट बोललं पाहिजे. कारण ते त्यांचे दुखणे आहे. त्यांना अजून कुणी हिंदूंचा कैवारी म्हणत नाही. त्यांच्या कारकिर्दीत हिंदूंना आक्रोश मोर्चे काढावे लागले. हिंदू सुरक्षित नाहीत. कधी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत उतरले नाहीत. पण निवडणूक लढायला संयुक्त महाराष्ट्र समितीत घुसले. ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाने त्यावेळी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला आणि ज्या मुस्लीम लीगने देशाची फाळणी मागितली. गांधी-काँग्रेसने इंग्रजांना चले जावचा नारा दिला. मुखर्जींनी चले जाव चळवळ कशी चिरडली पाहिजे. तिच्याशी कसा मुकाबला केला पाहिजे, आम्हाला इंग्रजांची राजवट देशाच्या कायदा सुव्यवस्थेसाठी पाहिजे असं यांच्या बापांनी म्हटलं होते. मुस्लीम लीगच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते. त्यांनी मला हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार शिकवायचे. त्यांच्याकडून मी शिकायचे? स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही नव्हता. देशाची फाळणी मागणाऱ्या तत्कालीन मुस्लीम लीगसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसला, तुमच्याकडून मी काय शिकायचे? असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या आरोपांना दिले आहे.