लोणावळा धरण भरले; इंद्रायणी काठच्या गावांना सतर्कतेचे इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 08:31 AM2017-07-23T08:31:50+5:302017-07-23T08:31:50+5:30
लोणावळा शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील
Next
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 23 - लोणावळा शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा मावळचे तहसिलदार रणजित देसाई यांनी दिला आहे.
टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून भिवपुरी येथील वीज निर्मिती केंद्राला पाणी सोडण्यात येते. मात्र खोपोली व रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला असल्याने लोणावळा धरणातील पाणी रायगड जिल्ह्यात न सोडता लोणावळ्यातून वाहणार्या इंद्रायणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे पत्र टाटा कंपनीने मावळ प्रशासनाला दिले आहे. या पत्राचा हवाला देत तहसिलदार रणजित देसाई यांनी सर्व पोलीस व प्रशासकीय यंत्रणांना याबाबत सुचित करुन नदीकाठच्या घरांना व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत कळविले असून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात यावे असे सूचित केले आहे. वास्तविक लोणावळ्यातून वाहणार्या इंद्रायणीला देखील सर्वत्र पुर आला आहे. असे असताना या नदीपात्रात पाणी सोडल्यास लोणावळा शहरात पाणी घुसण्याची भीती वर्तवली जात आहे.