लोणावळा दुहेरी हत्या प्रकरण : संतप्त नातेवाईकांचा आंदोलनाचा इशारा
By admin | Published: May 1, 2017 05:50 PM2017-05-01T17:50:41+5:302017-05-01T17:50:41+5:30
लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्हा हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाला तब्बल 30 दिवस पूर्ण झालेत.
Next
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 1 - लोणावळा शहरासह संपूर्ण पुणे जिल्हा हादरवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाला तब्बल 30 दिवस पूर्ण झालेत. मात्र लोणावळा शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याप्रकरणातील आरोपींचा काहीच थागपत्ता लागत नसल्याने नातेवाईक संतप्त झालेत.
त्यामुळे पुढील 20 दिवसांत आरोपींचा शोध न घेतल्यास लोणावळ्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सार्थक वाकचौरे याचे चुलते कैलास वाकचौरे, भाऊ विक्की वाकचौरे व त्याचे मित्र ऋषीकेश खलाने यांनी निवेदनाद्वारे लोणावळा पोलिसांना दिला आहे.
आरोपींचा शोध घेत या दुहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 14 अधिकार्यांच्या समावेश असलेल्या आठ टीम तपास करत आहेत. जवळपास सव्वालाख मोबाइल फोन तपासून काही संशयितांचा सखोल तपास सुरू आहे. मात्र अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने तपास यंत्रणेवर आता मृत सार्थकचे नातेवाईक व मित्र परिवार यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सदर खून हा चोरीच्या उद्देशाने झाला असावा का?, की एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली असावी का? खूनामागे मयत सार्थक व श्रुती यांच्यापैकी कोणाच्या भुतकाळातील घटना आहेत का? ऑनर किलिंगचा प्रकार आहे का? पर्यटनस्थळ परिसरात फिरणारे भुरटे चोर वा गर्दुले यांना हा प्रकार केला असावा का? त्यांचा खून घटनास्थळींच झाला की अन्य कोठे मारुन त्यांना त्याठिकाणी टाकण्यात आले? त्यांचा अंगावरील अंगटी, घड्याळ, पैशांचे पाकीट यापैकी काहीही न नेता फक्त दोघांचे मोबाइल गायब असल्याने त्यांच्या मोबाइलमध्ये असे काय होते? अशा विविध बाबींचा तपास वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून सुरु आहे.
खून करणार्यांनी अतिशय शांत डोक्याने व कसलाही पुरावा मागे न ठेवता पोबारा केला असल्याने आरोपींपर्यत पोहोचण्याची कडी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. पुराव्यांअभावी अतिशय आव्हानात्मक बनलेल्या या प्रकरणाचा उलगडा पोलीस कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान नातेवाईकांनी पोलिसांना 20 दिवसांचा अवधी देत आंदोलनाचा इशारा दिल्याने तपासाची सुत्रे वेगाने हलण्याची शक्यता आहे.