लोणावळा दुहेरी हत्येप्रकरणी दोन जण पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: June 11, 2017 12:43 PM2017-06-11T12:43:20+5:302017-06-11T12:43:20+5:30
दुहेरी हत्येप्रकरणी पुणे ग्रामीणचे विशेष तपास पथक (एसआयटी) व पुणे एलसीबीच्या पथकाने संयुक्त कारवाई राबवत दोन जणांना आज पहाटे लोणावळ्यातून ताब्यात घेतले
ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 11 - लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हालवून सोडलेल्या लोणावळा शहरातील महाविद्यालयीन युवक युवती यांच्या दुहेरी हत्येप्रकरणी पुणे ग्रामीणचे विशेष तपास पथक (एसआयटी) व पुणे एलसीबीच्या पथकाने संयुक्त कारवाई राबवत दोन जणांना आज पहाटे लोणावळ्यातून ताब्यात घेतले. असिफ शेख (रा. लोणावळा) व त्यांचा अन्य एक साथिदार यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लोणावळ्यातील या डबल मर्डर प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले तरी देखील पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नसल्याने मृत युवक आणि युवतीच्या नातेवाईकांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी नेमलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी) व एलसीबीला याप्रकरणी अखेर मोठे यश मिळाले आहे.
२ एप्रिल रोजी रात्री लोणावळा आयएनएस शिवाजीसमोरील एस पाॅइंट डोंगरावर सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसर्या वर्गात शिकणारा नगर जिल्ह्यातील सार्थक वाकचौरे व पुणे जिल्हातील श्रुती डुंबरे या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा अंगातील कपडे काढून दगडाने आणि अज्ञात हत्याराने डोक्यात व शरीरावर वार करून खून करण्यात आला होता. ३ एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकिस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील 14 अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या 8 तपास पथकांनी घटनास्थळ व परिसर पिंजून काढला.
खुनामागील वेगवेगळ्या शक्यता पडताळताना जवळपास दीड लाख फोन कॉल्स, मयत युवक व युवती यांचे मित्र, रेकॉर्डवरील गुन्हेगार, फोन कॉल्सवरील संशयित अशा जवळपास दोन हजारांहून अधिक जणांची चौकशी केली. हा खून नेमका कोणी व कोणत्या कारणांसाठी केला असावा याचा मागोवा कसोशीने सुरू होता. मागील काही दिवसांपासून लोणावळ्यातील विविध दारू अड्ड्यांवर पोलीस लक्ष ठेवून होते. आज रविवारी पहाटे या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे विश्वसनीय माहिती मिळाली आहे. आरोपी हे नशेखोर असून किरकोळ पैशासाठी हा खून झाल्याचे समजते.