बुलडाण्याच्या सुपुत्राला लंडनची स्काॅलरशिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 05:06 PM2021-06-30T17:06:16+5:302021-06-30T18:17:16+5:30
London Scholarship to Buldana's student : जगभरातील ६० हजार विद्यार्थ्यांमधून भारतातील ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
- संदीप वानखडे
बुलडाणा : समाजसेवेचा वसा घेतलेल्या जिल्ह्यातील एका ध्येयवेड्या तरुणाने ब्रिटिश सरकारच्या अत्यंत प्रतिष्ठित असलेली चेव्हेनिंग (Chevening) स्काॅलरशिप मिळिवली आहे. जगभरातील ६० हजार विद्यार्थ्यांमधून भारतातील ४० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील पिंप्री (खंदारे) येथील राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याचा समावेश आहे. जगभरातील केवळ एक टक्का विद्यार्थ्यांची निवड या स्काॅलरशिपसाठी हाेते. उच्च शिक्षणासाठी जगभरातील १९ विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी राजूची निवड झाली आहे़ जवळपास ४५ लाख रुपयांपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळणार आहे़
लोणार तालुक्यातलं पिंप्री (खंदारे) हे राजू केंद्रे यांचे मूळ गाव. दहावी-बारावीमध्ये चांगले गुण मिळाले आणि भारत विद्यालय बुलडाणा येथे शिकत असताना डॉक्टर होऊन समाजासाठी काहीतरी काम करूया असे विचार त्यांच्या मनात येत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना राजूचा मेळघाटाशी जवळचा संबंध आला. मेळघाटात राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेदरम्यान बालमृत्यू, कुपोषण, रोजगार हमी योजनेवर त्याने काम केले. मुख्यमंत्री फेलोशिप मिळाल्यानंतर राजू केंद्रे याने यवतमाळ येथील पारधीबेडा येथे प्रबाेधनाचे कार्य केले.
अशी झाली निवड
या स्काॅलरशिपसाठी १६० देशांमधून ६३ हजार अर्ज आले हाेते. त्यातील पाच हजार लाेकांनी दाेन राऊंडनंतर मुलाखत दिली. त्यातून १३५० लाेकांची अंतिम निवड झाली़ म्हणजे १.५ टक्के लाेकांची निवड झाली. ही स्काॅलरशीप फाॅरेन काॅमनवेल्थ डिपार्टमेंट देते. राजू केंद्रे हे ज्या विद्यापीठात प्रवेश घेतील त्याची पूर्ण फी व राहणे, तसेच खाण्याचा खर्च शिष्यवृत्तीतून भागविला जाणार आहे.