शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 12:53 AM2018-03-11T00:53:22+5:302018-03-11T00:53:49+5:30

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर पोहोचला आहे.

Long March of farmers on the border of Mumbai | शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ  

शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर, ठाण्यात धडकले लाल वादळ  

googlenewsNext

ठाणे - शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या सीमेवर पोहोचला आहे.  हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेले हे लाल वादळ शनिवारी रात्री ठाणे शहरात दाखल झाले. मोर्चेकऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. आता हे शेतकरी सोमवारी विधान भवनाला घेराव घालणार असून, त्यामुळे सोमवारी मुंबईतील रस्ते जाम होण्याची शक्यता आहे. 
विधान भवनाच्या दिशेने आगेकूच करत असलेल्या या मोर्चाला आता विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळू लागला असून, शिवसेना आणि मनसेने मोर्चाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चेकऱ्यांशी फोनवरून संवाद साधला आहे. ठाण्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांची व्यवस्था केली असून, हा महामोर्चा मुंबईत दाखल झाल्यावर मनसेकडून चेंबूर येथे मोर्चाचे स्वागत होणार आहे. 


 
....आणि लॉंग मार्चमधील माय मावल्यांच्या हृदयाचा बांध फुटला ! 

दरम्यान ठाण्याआधी शेतकऱ्यांचा लॉंग मार्च कसारा घाट उतरून शहापूर तालुक्यात दाखल झाला होता. शेतकरी बापाने आत्महत्या केलेल्या 25 मुलींनी या लॉंग मार्चचे अत्यंत हृदयद्रावक शब्दात स्वागत केले. शेतकरी बापाच्या आत्महत्येचे दुःख लॉंग मार्च समोर मांडताना शेतकऱ्यांच्या या लेकी अत्यंत भावना  विवश झाल्या होत्या. शेती परवडली नाही म्हणून हतबल होत बापानं आत्महत्या केली. तुम्ही उरलेल्या बापांना घामाचे दाम मिळावे म्हणून लढत आहात  म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा शब्दात शेतकऱ्यांच्या या लेकींनी लॉंग मार्चला आपला पाठिंबा व्यक्त केला. बापाच्या व्यथा मांडताना त्यांचा कंठ दाटून येत होता. लॉंग मार्च मध्ये सामील शेतकऱ्यांच्या पोरांच्याही काळजाला पीळ पडत होता. माय मावल्यांनी तर अश्रूंना वाट मोकळी एकूण देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आत्महत्या पर्याय नाही संघर्ष पर्याय असल्याचे या मुली काकुळतीला येऊन सांगत होत्या. शेतकऱ्यांच्या या लेकींना वडील गेल्या नंतर आधार तीर्थ आधार आश्रम नाशिक या संस्थेने आधार दिला. संस्थेचे त्रिंबक गायकवाड हे ही यावेळी उपस्थित होते. 
घाटन देवी येथील मुक्काम संपवून लॉंग मार्चची अत्यंत उत्सहात  सकाळी 7 वाजता पुन्हा मुंबईकडे कूच केले. रस्त्यात गावोगावचे शेतकरी लॉंगमार्च मध्ये सामील होत असल्याने लॉंग मार्च मध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांचा उत्साह वाढत आहे. पिण्याचे पाणी व फुले देऊन गावोवागचे शेतकरी लॉंगमार्चचे स्वागत करत आहेत. मोरखाने येथील माजी सरपंच वेखंडे यांनी पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देत शेतकऱ्यांचे स्वागत केले. कसारा घाट उतरल्या नंतर शहापूर तालुक्यातील शेतकरी लॉंग मार्च मध्ये सामील झाले. वाडा, तलासरी व परिसरातील शेतकरी उद्या लॉंगमार्चमध्ये सामील होतील. 
प्रखर उन्हात लॉंग मार्च सुरु असल्याने लॉंग मार्च मध्ये सामील असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. उन्हाचा असह्य चटका बसत असल्याने अनेक शेतकरी त्यामुळे आजारी पडत आहेत. नाशिक येथील एम.एस.एम.आर.ए. संघटनेने या शेतकऱ्यांसाठी आज उपचार करण्यासाठी पुढाकार घेतला. डॉ. समीर आहिरे, विशाखा बावा, युवराज बावा, मंगलाताई गोसावी, डॉ. मंगेश मांडावे यांनी यावेळी आजारी शेतकऱ्यांवर उपचार केले.  
शेतकरी कर्जमुक्ती, शेतीमालाचे भाव, स्वामिनाथन अयोग्य,वनाधिकार,सिंचन, पेन्शन व रेशन या ज्वलंत प्रश्नावर मार्ग निघाल्या शिवाय आता माघार घेणार नसल्याचा संकल्प या पार्श्वभूमीवर किसान सभेने व्यक्त केला आहे. आज संपूर्ण दिवस प्रचंड उन्हाचा तडाखा असताना लॉंग मार्च बिलकुलही विस्कळीत न होता सुरु राहिल्याने लॉंग मार्च मध्ये प्रचंड आशेचे वातावरण पसरले आहे. डॉ.अशोक ढवळे, आ.जे.पी.गावीत, किसन गुजर, डॉ.अजित नवले, सावळीराम पवार, इंद्रजित गावीत, विलास बाबर, उमेश देशमुख आदी लॉंग मार्चचे नेतृत्व करत आहेत.

Web Title: Long March of farmers on the border of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.