मुलगी जन्माला आल्यास दीर्घकालीन विमा योजना
By admin | Published: January 12, 2016 03:07 AM2016-01-12T03:07:56+5:302016-01-12T03:07:56+5:30
एसटी कर्मचाऱ्याच्या घरात मुलगी जन्माला आली तर तीच्या नावे एसटी महामंडळातर्फे दिर्घकालीन विमा काढण्यात यावा,अशी सूचना परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते
मुंबई : एसटी कर्मचाऱ्याच्या घरात मुलगी जन्माला आली तर तीच्या नावे एसटी महामंडळातर्फे दिर्घकालीन विमा काढण्यात यावा,अशी सूचना परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाला केली. एसटी महामंडळाच्यावतीने अपघात टाळण्यासाठी आणि रस्ते सुरक्षेसाठी सुरक्षितता मोहीमेची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली. या मोहीमेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी महामंडळाला सूचना केली.
यावेळी रस्ते अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे हे सांगतानाच चालकाची मनस्थिती हा महत्वाचा घटक असल्याचे रावते म्हणाले. चालक, वाहकाला ड्युटी करत असताना त्यांना त्यांच्या घरासारखी रेस्ट रुम मिळाली पाहिजे. त्यासाठी आगारातील प्रसाधनगृहे स्वच्छ असणे, आपण कुटुंबापासून दूर राहात असल्याची जाणीव होऊ नये यासाठी रेस्ट रुमला काही मनोरंजनाची सोय करण्याची सूचनाही एसटी प्रशासनाला केली. या प्रसंगी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनीही राज्याच्या रस्ते वाहतुकीमध्ये एसटी महामंडळाचा सिंहाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले. एसटीचे अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षात सातत्याने कमी होत असल्याचे दिसून येते. सध्या हे प्रमाण दर लाख किलोमीटरला 0.१५ टक्के इतके आहे. भविष्यात हेच प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
अधिकाऱ्यांची कानउघाडणी
यावेळी रावते यांच्याकडून एसटी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सूचनांचे पालन करण्याची आवश्यक्ता असल्याचे सांगत किमान सात दिवसांनी अधिकाऱ्यांनी एकत्र बसून विविध समस्यांबाबत चर्चा करायला हवी.