भाजपसाठी पल्ला लांबच लांब!
By admin | Published: February 9, 2017 10:19 PM2017-02-09T22:19:27+5:302017-02-09T22:19:27+5:30
कुठेही बहुमत नाही : चार ठिकाणी शून्य, सोळा जिल्हा परिषदेमध्ये केवळ एक आकडी सदस्य
वसंत भोसले-- कोल्हापूर --केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदांच्या सत्तेवर मांड टाकण्यासाठी लांबच्या लांब पल्ला गाठावा लागणार आहे. राज्यातील ३४ पैकी २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्यापैकी चार ठिकाणी भाजपने गत निवडणुकीत खातेही उघडले नव्हते तर सोळा जिल्हा परिषदेतील त्यांचे संख्याबळ केवळ एक आकडीच होते. स्वबळावर एकाही जिल्हा परिषदेत बहुमताने सत्ता नव्हती, केवळ पाच जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप बहुमताजवळ गेला होता.
राज्यातील पंचवीसपैकी पंधरा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच भाजपच्या प्रचाराची धुरा स्वीकारून जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यातून निवडणुकीचा धडाकेबाज प्रचार सुरू केला आहे. दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीस होणाऱ्या दहा जिल्हा परिषदांच्या अर्जांची भरती झाली आहे. सोमवारी माघारीनंतर चित्र स्पष्ट होऊन तेथेही प्रचाराचा धुरळा उडणार आहे. नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत राज्यातील चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस होती. त्यात भाजपने चौथ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर मजल मारल्याने जिल्हा परिषदांची सत्ताही हस्तगत करण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
बीडमध्ये ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीशी टक्कर देत ५९ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीने ३० जागा जिंकून बहुमताचा काठ गाठला होता. जालन्यात प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा प्रभाव राहिला होता. तेथे ५५ पैकी १५ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीला १६ तर शिवसेनेनेही १५ जागा जिंकल्या होत्या. चंद्रपूरमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तेथे ५७ पैकी १८ जागा जिंकल्या होत्या. कॉँग्रेस २१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला होता.
वर्धामध्ये ५१ पैकी १७ जागा भाजपने पटकावल्या होत्या. नागपूर पाठोपाठ विदर्भातील भाजपची ही चांगली कामगिरी होती. कॉँग्रेसनेही १७ जागा जिंकल्या होत्या. एकनाथ खडसे यांचा दबदबा असलेल्या जळगावमध्ये भाजप बहुमतापासून दूर राहिला होता. राष्ट्रवादीशी टक्कर देत भाजपने ६८ पैकी २३ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसने २० जागा तर कॉँग्रेस १० तर शिवसेनेने १५ जागा पटकावल्या होत्या. या पाच जिल्हा परिषदांमध्येच भाजपने मुसंडी मारली होती.
गत निवडणुकीच्या निकालाची ही आकडेवारी पाहता भाजपला खूपच लांबचा पल्ला गाठायचा आहे. जिल्हा परिषदांच्या राजकारणावर पकड असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सर्वत्र लागलेली गळती, कॉँग्रेसमधील नेत्यांची गटबाजी आणि शिवसेनेचे जिल्हा परिषदांच्या राजकारणाकडे असलेले दुर्लक्ष अशा पार्श्वभूमीवर ही लढत होणार आहे. त्यात भाजपला झेंडा रोवण्याची संधी आहे, पण टप्पाही मोठा आणि लांब आहे. कारण भाजपची ताकद अनेक ठिकाणी मर्यादित आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून आलेल्या अनेक स्थानिक नेत्यांच्या बळावरच ही लढाई अनेक ठिकाणी लढताना भाजप दिसतो आहे.
भाजपा तिसऱ्या स्थानावर
२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भाजप तिसऱ्या स्थानावर होता. पंचवीसपैकी केवळ चंद्रपूर (१८), वर्धा (१७), बीड (२०), जालना (१५) आणि जळगाव (२३) या पाचच जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्तेपर्यंत मजल गेली होती. एकाही ठिकाणी बहुमत मिळाले नव्हते. सातारा, सांगली, सोलापूर आणि हिंगोलीत खातेही उघडले नव्हते. उर्वरित सोळा जिल्हा परिषदांमध्ये केवळ एक आकडी संख्येवरच भाजप राहिला होता. त्यात रायगड (१), रत्नागिरी (७), सिंधुदुर्ग (३), नाशिक (४), बुलढाणा (४), यवतमाळ (४), अमरावती (९), गडचिरोली (८), पुणे (३), कोल्हापूर (१), नगर (६), औरंगाबाद (६), परभणी (२), उस्मानाबाद (२), नांदेड (४), लातूर (८) या जिल्हा परिषदांचा समावेश आहे.