लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळाच चुकीच्या
By admin | Published: January 29, 2016 01:32 AM2016-01-29T01:32:29+5:302016-01-29T01:32:29+5:30
पहाटेच्या वेळेत कल्याणहून मुंबईच्या दिशेला धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून उपनगरी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्याची शक्कल मध्य रेल्वे प्रशासनाने लढवली.
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
पहाटेच्या वेळेत कल्याणहून मुंबईच्या दिशेला धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून उपनगरी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्याची शक्कल मध्य रेल्वे प्रशासनाने लढवली. ज्या वेळेत चाकरमानी जातच नाहीत, त्या वेळेत ही सुविधा देऊन प्रशासनाने प्रवाशांची थट्टा केली आहे. अशा गाड्यांचा उपयोग काय? त्या अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा संतप्त सूर महिला प्रवाशांमधून उमटला आहे.
सुविधा द्यायची म्हणून दिली जाते, त्याचा काही उपयोग होणार आहे की नाही, याचा विचार केला जातो की नाही? ही सुविधा केंद्रातून आली की, येथील वातानुकूलित जागेत बसून कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची ही कल्पना आहे, असा सवालही महिलांनी केला. ज्यांना गर्दीच्या वेळांची माहिती नाही, गर्दीची स्थानके, ठिकाणे माहिती नाहीत, ते काय सुविधा देणार? ही चेष्टा आहे का? पहाटेच्या वेळेतील गाड्या देण्याचा नेमका उद्देश काय, त्यामुळे गर्दी नियंत्रणात येणार आहे का? चाकरमानी महिला प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळांबाबत प्रशासनाला माहिती नाही, ही शोकांतिका असल्याचीही चर्चा कल्याण, डोंबिवली, दिवा, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव आदी स्थानकांमध्ये गुरुवारी सुरू होती.
ज्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवासाची सुविधा दिली आहे, त्या गाड्या कल्याणमध्ये, ठाण्यात थांबतात. त्याही पहाटेच्या वेळेत. त्यांचा काहीही उपयोग नाही. त्यातच सर्वाधिक गर्दी ही डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा या स्थानकांसह बदलापूर, अंबरनाथ आदी स्थानकांमध्ये असते. त्या प्रवाशांनाही ही सुविधा काहीही कामाची नाही. प्रशासनाने सुविधा दिली की महिलांची थट्टा केली?
- लता अरगडे, सहप्रवक्ता, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
आसनगावसह कसारा मार्गावरील महिला-पुरुष प्रवाशांकडे नेहमीच कानाडोळा करण्यात आला आहे, हे योग्य नाही. गाड्याही वाढवलेल्या नाहीत. लेडिज स्पेशलचा तर मागमूसही नाही. प्रवास करायचा तरी कसा? सकाळच्या वेळेत डोंबिवली स्थानकात उतरताना नाकीनऊ येतात, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती आहे का?
- अनिता झोपे, अध्यक्षा कल्याण-कसारा रेल्वे पॅसे. असो.
ठाणे-वाशी या ट्रान्स-हार्बर मार्गावरील मातृभूमी स्पेशल ही महिला लोकल रद्द केल्याने ती लोकल मुख्य मार्गावर बदलापूर-अंबरनाथपासून सकाळच्या वेळेत देण्यात यावी.
- रेखा जाधव,
अंबरनाथ रेल्वे प्रवासी संस्था