राज्यातील सरकार जास्त काळ टिकणार नाही: लोणीकरांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 02:30 PM2020-02-14T14:30:48+5:302020-02-14T14:31:21+5:30
मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे.
मुंबई : मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड आणि उजनी धरणातून लातूर शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या घोषणेचे काय होणार याची चिंता लातूरकरांना लागली आहे. तर उजनी धरणातून लातूरसाठी पाणी मिळणारी योजना बंद केल्यास हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
लातूर येथे पत्रकारांशी बोलताना लोणीकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला उजनीचे पाणी देण्याची घोषणा केली. बोगद्यातून पाणी आणण्याचा निर्णय सुद्धा झाला. त्या कामाचे डिझाईन तयार झाले. मात्र या सरकराने हे काम थांबवल असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला.
तर लातूरच्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतीला पाणी देणं गरजेचे आहे. त्यामुळे लातूर येथील पाणी पुरवठ्याचा विचार करून आणि नेहमीची दुष्काळी परिस्थिती पाहता उजनीचे पाणी आणण्याची योजना थांबवू नये अशी सरकारला विनंती आहे. त्यांनी जर हे काम थांबवलं, तर हे सरकार फार काळ चालणार नाही, असा खोचक टोला लोणीकर यांनी सरकाराला लगावला.
तसेच ह्या सरकारनं हे काम थांबवलं तर पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर ही योजना आम्ही पूर्ण करू असेही लोणीकर म्हणाले. लातूर येथे झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.