४० लोक पळालेला सुरतचा रस्ता बघा, आदित्य ठाकरेंचा टोला; गुलाबराव झाले आक्रमक म्हणाले...तुमचा विषयच संपला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:54 PM2022-12-20T16:54:09+5:302022-12-20T16:56:25+5:30
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
मुंबई-
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा आणि शहरी भागातील ट्रॅफिकचा मुद्दा उपस्थित करताना शिंदे गटाला जोरदार टोला हाणला. त्यावर मंत्री शंभुराजे देसाई आणि गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गुलाबाराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला भर सभागृहातच 'गेले तुम्ही आणि तुमचा विषयच आता संपला आहे', असं प्रत्युत्तर दिलं.
नेमकं काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील रस्त्यांवरील अपघात आणि नियम मोडणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित केले. तसंच मुंबईसह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या ट्राफिकचा मुद्दा उपस्थित केला. हे बोलत असतानाच आदित्य ठाकरे यांनी मुंबई-सुरत रस्त्याचा उल्लेख केला. "माझी सरकारला एक सूचना अशी आहे की रस्ते बनवताना अलिकडे एक रस्ता असा आहे की ४० लोक रात्रीही पळून जायचे आणि दिवसाही पळून जायचे तो रस्ता म्हणजे मुंबई-सुरत. मग या रस्त्याची क्वालिटी तपासून पाहावी आणि तसा रस्ता जर बनला तर पळता येतं, धावता येतं आणि तिथून गुवाहटीलाही जाता येतं", असं म्हटलं.
गुलाबराव पाटील झाले आक्रमक
"विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रश्न विचारला. तोच प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला. सुरतचा प्रश्न आणि गुवाहटीचा प्रश्न यांनी काढू नये. यांना जर डिबेट करायचं आहे ना मग यांना दाखवून देऊ की मातोश्रीचे रस्ते कसे होते आणि कसे झाले ही बोलण्याची गरज नाही. सुरत कसे गेले, गुवाहटी कसे गेले हे काय विचारता. गेले...संपला आता विषय तुमचा. गेले तुम्ही", असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना दिलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम