‘बेळगाव’च पाहिज
By admin | Published: October 21, 2014 12:29 AM2014-10-21T00:29:53+5:302014-10-21T00:30:12+5:30
‘काळा दिन’ पाळणारच : महाराष्ट्र एकीकरण समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा े
बेळगाव : केंद्र सरकारने बेळगावचे नामांतर ‘बेळगावी’ करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना केंद्र सरकारने कर्नाटक सरकारच्या बेळगावी नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आगामी १ नोव्हेंबरपासून बेळगाव शहराचे बेळगावी असे कन्नड भाषेच्या शब्दावरून उच्चार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या राजपत्रात बेळगावी अशी नोंद करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.
सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मराठी भाषिकांनी केंद्र व कर्नाटक सरकारच्या निर्णयास विरोध व्यक्त केला.
मध्यवर्र्ती समितीचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका पंचायत कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
एकीकरण समितीने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९५३ च्या केंद्राच्या कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्याही शहराचे नामकरण करताना खास कारणाशिवाय बदल करता येत नाही, तसेच शहराचे नाव ऐतिहासिक असेल, तर ते बदलताही येत नाही आणि कोणत्याही शहराचे नाव बदलताना भाषिक तेढ निर्माण झाल्यास ते बदलता येत नाही. केंद्र सरकारने या तत्त्वांचे उल्लंघन करून बेळगावी नामकरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे हे नामकरण रद्द करावे आणि बेळगाव असेच नाव पूर्ववत ठेवावे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना बेळगावचे नामकरण केल्याचे सुप्रीम कोर्टातील वकिलांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जाणार असून, कायदेशीर लढाई करण्याचे संकेतदेखील एकीकरण समितीने दिले आहेत.
‘काळा दिन’ पाळणारच
एकीकरण समितीच्या काही मोजक्या नेत्यांना जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी चर्चेसाठी पाचारण केले.
त्यावेळी दोन आमदारांसह एकीकरण समितीच्या नेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी १ नोव्हेंबर हा दिन ‘काळा दिन’ म्हणून साजरा करू नका, दुसऱ्या दिवशी साजरा करा, अशी सूचना केली.
यावेळी समितीच्या नेत्यांनी ‘आपण १ नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून साजरा करणारच’ असे ठणकावून सांगितले.
कर्नाटक सरकार कारवाई करेल, या भीतीने मोर्चामध्ये मराठी भाषिकांच्या मतावर निवडून आलेले महापौर महेश नाईक मात्र गैरहजर होते, हा चर्चेचा विषय होता.
बेळगावी नामांतर केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी मोर्चा काढला. एकीकरण समितीच्या नेत्यांनी यावेळी जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.