निवडणूक खर्चावर नजर
By admin | Published: February 7, 2017 05:02 AM2017-02-07T05:02:34+5:302017-02-07T05:02:34+5:30
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीतील खर्च विषयक बाबींवर करडी नजर ठेवली जात असून त्यासाठी आयकर आणि विक्रीकर विभागाकडील अधिकाऱ्यांची नियक्ती करण्यात आली आहे.
पंढरपूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीतील खर्च विषयक बाबींवर करडी नजर ठेवली जात असून त्यासाठी आयकर आणि विक्रीकर विभागाकडील अधिकाऱ्यांची नियक्ती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे, वन विभाग, विमानतळ, सागरी मार्ग या ठिकाणी होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने तपासणी केंद्रे तसेच वेगळी यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लोकांना अपेक्षित असलेली निवडणूक होण्यासाठी राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशानामार्फत काम केले जात आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी विहित मुदतीत आपल्या खर्चाचा तपशील आयोगाकडे सादर न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. निवडणूक आयोगाने एक अॅप विकसित केले आहे़ यावर मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. तर उमेदवारास निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाची माहितीही या अॅपद्वारे सादर करता येणार आहे. मतदारांना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची माहिती अवगत होण्यासाठी उमेदवारांच्या शपथ पत्राचा गोषवारा मतदान केंद्राबाहेर मतदारांना सहज दिसेल, अशा स्वरुपात बॅनरवर लावण्यात येणार आहेत. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचेही सहारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)