कोकणाची नजर मुंबईकडे
By admin | Published: February 16, 2017 12:28 AM2017-02-16T00:28:27+5:302017-02-16T00:28:27+5:30
महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला.
वसंत भोसले / कोल्हापूर
महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देणारा फटाका शिवसेना-भारतीय जनता पक्षाची महापालिका, तसेच जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती तुटल्याने उडाला. त्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईचे वारे कोकणातून वाहणाऱ्या प्रदेशावर झाला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा यांची रस्सीखेच अधिकच ताणली गेली, तर त्याचा परिणाम सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसला संधी मिळवून देण्यात होईल, तर रत्नागिरीत मोठे कोण, शिवसेना
की भाजपा हे ठरेल. त्यामुळे ही निवडणूक नारायण राणे यांच्या वर्चस्वासाठी, शिवसेनेच्या अस्तित्वासाठी आणि भाजपाच्या प्रतिष्ठेची ठरली आहे.
रत्नागिरीत आजवर युती करून लढलेली शिवसेना आणि भाजपा प्रथमच रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवत असल्याने, या दोन पक्षांमध्येच अधिक रस्सीखेच रंगली आहे. त्यात शिवसेनेतील अनेक नाराज भाजपाच्या वळचणीला आल्यामुळे या लढतींमध्ये अधिक रंगत आली आहे. गतवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाची आघाडी केली असली, तरी आतापर्यंतच्या टप्प्यात ही आघाडी अजून पिछाडीवरच आहे.
गतवेळी ५७ पैकी ३३ जागा शिवसेना-भाजपा युतीच्या पदरात पडल्या होत्या. त्यात शिवसेनेचा वाटा २५ जागांचा, तर भाजपाचा वाटा केवळ आठ जागांचा होता. मात्र, नगर परिषद निवडणुकीतील यशामुळे भाजपाने जिल्हा परिषदेतही स्वबळ आजमाविण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सर्व पक्षीय नाराजांची मोट बांधण्यात भाजपाला यश आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक टक्कर ही भाजपाकडूनच दिली जाणार आहे.
चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीची बाजू काहीशी तोकडी झाली आहे. गतवेळी चिपळूण तालुक्यात ९ पैकी ५ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे होते. गुहागरचे आमदार भास्कर जाधव, तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी राष्ट्रवादीची ताकद पणाला लावण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे. मात्र, अंतर्गत वादामुळे राष्ट्रवादी मागे पडली आहे. राजापूर तालुक्यात सक्षम असलेली काँग्रेस जिल्ह्यात इतर ठिकाणी मात्र दुबळी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. अर्थात, या आघाडीकडून फार मोठ्या करिश्म्याची अपेक्षा नाही.