जीवनाकडे सकारात्मकतेने पाहा
By admin | Published: March 2, 2017 01:08 AM2017-03-02T01:08:37+5:302017-03-02T01:08:37+5:30
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक भान येते
पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना सामाजिक भान येते. युवकांनी नकारात्मक विचार न करता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. तसेच आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून व प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास युवकांना नक्कीच यशस्वी होता येईल, असे मत प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे आयोजित ‘उत्कर्ष २0१६-१७’ या सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी नागराज मंजुळे बोलत होते. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावले, तर उपविजेतेपद नागपूर विद्यापीठाला मिळाले. तसेच सर्वोत्कृष्ट कलाकार पदाचे पारितोषिक पुणे विद्यापीठाच्या शुभांग घाटेकर याला मिळाले. कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, बीसीयूडी डॉ. राजा दीक्षित, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, क्रीडा संचालक डॉ. दीपक माने आदी उपस्थित होते.
साहित्य व नृत्य गटाचे पारितोषिक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकावले. तसेच संकल्पना नृत्य स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कल्याणी सरवडकर हिने, तर भारतीय लोकवाद्य गटाचे पारितोषिक शुभांग घाटेकर याने, भित्तीचित्र व घोषवाक्य स्पर्धेचे पारितोषिक सोमेश गुरव याने,
तर कवितेचे पारितोषिक अंकुश आरेकर याने मिळवले. संगीत
गटाचे व ललित कला गटाचे
उत्कृष्ट संघाचे पारितोषिक
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाने मिळवले.
डॉ. गाडे म्हणाले, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील विविध सामाजिक व सांस्कृतिक स्तरांतून अनेक विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकत्र येता आले, अशा संधी सहज उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांना या स्पर्धांमधून अनेक गोष्टी शिकता आल्या असतील याची मला खात्री वाटते.