मोदीजी, मुंबईतील नद्यांकडेही लक्ष द्या
By admin | Published: April 26, 2016 02:26 AM2016-04-26T02:26:50+5:302016-04-26T02:26:50+5:30
देश स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मुंबईकरांनी शहरातील चारही नद्यांच्या स्वच्छतेसाठी हाक दिली आहे.
सचिन लुंगसे,
मुंबई- ‘स्वच्छ भारत’ अभियानाची हाक देत अवघा देश स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता मुंबईकरांनी शहरातील चारही नद्यांच्या स्वच्छतेसाठी हाक दिली आहे. मुंबईमधील मिठी, दहिसर, ओशिवरा आणि पोईसर या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि रिव्हर मार्चतर्फे ‘आॅनलाइन याचिका’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेला जलपुरुष राजेंद्र सिंह यांनीही पाठिंबा दिला आहे. ही ‘आॅनलाइन याचिका’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला सादर करण्यात आली आहे.
२००५ साली मिठी नदीला आलेल्या महापुरानंतर अवघी मुंबई पाण्याखाली गेली होती. परिणामी मुंबई महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिठी नदीच्या खोलीकरणासह रुंदीकरणाचे काम हाती घेतले. आता मिठीचे पात्र रुंद झाले आहे.
नदीची खोली वाढली असली तरी औद्योगिक जलप्रदूषणामुळे तिचा श्वास अद्यापही कोंडलेला आहे. शिवाय मुंबई पश्चिम उपनगरांतील दहिसर, पोईसर आणि ओशिवरा या नद्यांची अवस्थाही अत्यंत वाईट आहे. मिठीसह या तिन्ही नद्या स्वच्छ व्हाव्यात, याकरिता महाराष्ट्र निसर्ग उद्यान आणि रिव्हर मार्च यांनी व्यापक चळवळ हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)