गरिबांकडे सहानुभूतीने बघा
By admin | Published: April 3, 2015 02:42 AM2015-04-03T02:42:54+5:302015-04-03T02:42:54+5:30
वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले.
मुंबई : वित्तीय चक्राच्या निर्मितीने कशी किमया साधता येते, याचे उदाहरण आपण पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून पाहिले. १४ कोटी खात्यांद्वारे १४ हजार कोटी रुपये वित्तीय व्यवस्थेत आले. पण, ही केवळ सरकारनेच चालविण्याची
योजना नसून या योजनेत भारतीय रिझर्व्ह बँकेने सक्रिय सहभागी होतानाच, आर्थिक योजनेचा मध्यबिंदू देशातील गरिब असावा, असे मत पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी व्यक्त केले.
भारतीय रिझर्व्ह बँकेला ८० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वित्तीय समायोजन, वित्तीय व्यवस्थेची गरिबांबद्दल असलेली अनास्था, कालमर्यादा निश्चित करून आखल्या जातील अशा लोकाभिमुख योजना आणि मेक इन इंडिया या मुद्यांभोवती पंतप्रधानांनी भाष्य केले. देशातील गरिब लोकांना बँकिंग व्यवस्थेचा अधिकाधिक फायदा होणे गरजेचे असल्याची भूमिका मांडतानाच, बँकांनी गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय द्यायला हवा, असे आवाहन मोदी यांनी केले. विशेषत: शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत चिंता व्यक्त करतानाच बँकिंग व्यवस्थेचा प्रसार योग्य पद्धतीने होणे गरजेचे असून, त्यांना वित्तपुरवठा करताना त्यात निधीचा अभाव येऊ नये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ वर्तमानपत्र आणि टीव्ही मीडियापुरता मर्यादित विषय नसून शेतकऱ्यांना मदत केल्याने बँका दिवाळखोरीत निघणार नाहीत हे बँकांनीदेखील समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. गरीब आणि शेतकरी या दोन्ही घटकांना कर्ज देताना आणि त्याची वसुली करताना बँकांनी संवेदनशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वित्तीय व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी आणि त्याचे फायदे सर्व स्तरातील लोकांना मिळण्यासाठी धोरण राबविले जात आहे. आगामी २० वर्षांत याची व्याप्ती तळागाळापर्यंत नेण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची सूचना त्यांनी केली. २०१९ साली महात्मा गांधी यांची १५०वी जयंती, २०२२ साली रिझर्व्ह बँकेची ७५ वर्षे, २०२५ साली रिझर्व्ह बँकेची ९० वर्षे आणि २०३५ साली शिखर बँखेची १०० वर्षे या टप्प्यांनुसार निश्चित उद्दिष्ट ठेवून देशातील प्रत्येक व्यक्ती अर्थसाखळीशी जोडली जायला हवी, अशी संकल्पना मोदी यांनी मांडली. मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)