...तर राजकारणात कधीच आलो नसतो; अमित ठाकरेंनी युवकांना स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:41 PM2022-08-13T13:41:48+5:302022-08-13T13:42:50+5:30
दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून यावं अशी साद अमित यांनी युवकांना घातली आहे.
पुणे - अलीकडच्या राजकारणात नेत्यांच्या कोलांट्याउड्या अन् बदलणारी सत्तासमीकरणे यामुळे युवकांचा राजकारणाकडे बघण्यांचा दृष्टीकोन बदलला आहे. कुणीही राजकारणात येण्यासाठी सहसा तयार होत नाही. राजकारण म्हटलं तर अनेक तरुण त्यापासून दूर राहणेच पसंत करतात. त्यात राजकीय मंडळीची पुढची पिढी राजकारणात उतरली आहे. त्यामुळे युवकांनी राजकारणात यावं का? असा प्रश्न पत्रकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेंना विचारला होता. त्यावर अमित यांनीही दिलखुलासपणे उत्तर दिले.
मनसे नेते अमित ठाकरे सध्या मनसे विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभर दौरा करत आहेत. यावेळी पुण्यात अमित ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, मी जर राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर राजकारणात कधीच आलो नसतो. मला लोकांसाठी काम करायला आवडतं. पण ही आवड असली तरी सध्याच राजकारण पाहता मी कधीच राजकारणात आलो नसतो. मात्र माझ्यासाठी राज साहेबांनी प्लॅटफॉर्म तयार करून दिलंय. त्यामुळे दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून यावं अशी साद अमित यांनी युवकांना घातली आहे.
त्याचसोबत सत्ता बदलाचे मला काही वाटत नाही. मी बातम्या वाचतच नाही. माझं फोकस क्लिअर आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवायचे. यासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांना उपलब्ध होईन. यासाठी माझा नंबर त्यांना देतोय. रोजगार, आरक्षण आणि स्पर्धा परीक्षा या समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत. या सोडविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मनविसेची शाखा असायला हवी. यामुळं माझा आणि त्यांचा संपर्क व्हायला हवा. त्यासाठी मी सध्या प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने मी हा दौरा करतोय असंही अमित ठाकरेंनी सांगितले.
गृहमंत्रिपदाची अफवा
मी मंत्री होणार अशी अफवा होती. पुढचे २० दिवस मला पत्रकार याबाबत सातत्याने विचारत होते. ही बातमी खोटी आहे असं राजसाहेबांनी सांगितले. मीदेखील सांगून थकलो होतो. म्हणून मी म्हटलं गृहमंत्रिपद दिले तर आपण विचार करू. राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल असं पत्रकारांना सांगितले. त्यावरून गृहमंत्रिपदाच्या बातम्या सुरू झाल्या असा किस्सा अमित ठाकरेंनी गंमतीने पत्रकारांना सांगितला.