मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 04:02 PM2020-06-19T16:02:27+5:302020-06-19T16:26:46+5:30
शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत यांनी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
मुंबई : आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून आता पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत यांनी पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी पाहण्याचे स्वप्न तर पूर्ण झाले. पण, आता आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो आहे. आता फक्त राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करायची वेळ आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
याचबरोबर, देशावर आलेल्या कोरोना संकट आणि चीन कुरापतींवर सुद्धा संजय राऊत यांनी भाष्य केले. तसेच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, म्हणून महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करू शकत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. याशिवाय, आता पूर्ण सत्ता हाती यायचे स्वप्न आहे. शिवसेनेचे १८० आमदार येतील, तेव्हाच खरे स्वप्न पूर्ण होईल, असेही संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेने विचारधारा बदलली नाही आणि शिवसेना कुणापुढे लाचारही होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना दिली. शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यामध्ये आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढण्यासाठीच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनाला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/pQXD1ISIDN
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) June 19, 2020
याचबरोबर, विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही आमची संस्कृती आहे. 'प्राण जाय पर वचन न जाये' ही आमची संस्कृती आहे. ही लाचार होणारी शिवसेना नाही आणि तुमचा शिवसेनाप्रमुखसुद्धा लाचार होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. मला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही. त्याचप्रमाणे भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी केला आहे.
आणखी बातम्या...
अक्साई चीन आता परत घेण्याची वेळ आली आहे - जामयांग नामग्याल
मलाला युसूफझाई झाली 'ग्रॅज्युएट', आनंद साजरा करत सांगितलं 'फ्युचर प्लॅनिंग'
आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'
Encounters In Jammu & Kashmir: सुरक्षा दलांना मोठं यश, जम्मू-काश्मीरमध्ये 8 दहशतवाद्यांना कंठस्नान