सध्याचे राजकारण पाहता, संन्यासच घ्यावासा वाटतो - उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:22 AM2019-08-31T05:22:40+5:302019-08-31T05:23:10+5:30
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे शुक्रवारी दुपारी भेट घेतली.
सातारा : ‘कोण इकडं जाणार, कोण तिकडं जाणार, याच्याशिवाय सध्या काही चर्चाच नाही... सध्याचे वातावरण पाहता राजकारणातून संन्यास घ्यावा असं वाटत आहे,’ असे हताश उद्गार राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे शुक्रवारी दुपारी भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘सध्या खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राजकारणाच्या पातळीवर सर्वचजण अस्वस्थ आहेत. कोणताही निर्णय घेतला तरी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वजण काळजीपूर्वक पावले टाकत आहेत; पण त्याबरोबरच सगळीकडची परिस्थिती पाहिली तर खूपच वेगळी आहे. या राजकारणाचा उबग आल्यासारखे वाटते. त्यामुळे कधी-कधी राजकारणापासूनच अलिप्त राहावे, असे वाटते.’
संभाजी भिडे यांच्या भेटीबाबत उदयनराजे म्हणाले, ‘आमचे खूप पूर्वीपासून सख्य आहे आणि मला कोणीही कधीही भेटू शकतो. त्यामुळे त्यांनीही भेट घेतली. यामध्ये सध्याच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसून ही भेट केवळ औपचारिक होती.’