साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त, मुख्यमंत्र्यांनी दिली प्रमाणपत्रे, निकषात बसणा-या सर्व शेतक-यांना कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 05:45 AM2017-10-19T05:45:49+5:302017-10-19T05:46:13+5:30
राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत गुरुवारी ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत गुरुवारी ८ लाख ४० हजार शेतक-यांना ४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. निवडक शेतक-यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या योजनेच्या निकषात बसणाºया सर्व शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कर्जमाफी सन्मान सोहळ्यास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सहकारमंत्री सुभाष देशमुख, मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.
जलयुक्त शिवारचा फायदा
नरक चतुर्दशीपासून पात्र शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येत असून, पहिल्याच दिवशी ४ लाख ६२ हजार शेतकºयांचे कर्जमाफ करण्यांत आले.
ही रक्कम ३ हजार २०० कोटी रुपये इतकी आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाºया ३ लाख ७८ हजार शेतकºयांना प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्यात आली. त्याची एकत्रित रक्कम ८०० कोटी रुपये असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
जलयुक्त शिवारमुळे २० लाख हेक्टरचे सिंचन क्षेत्र निर्माण झाले असून, राज्याचे कृषी उत्पन्न हे ४० हजार कोटी रुपयांनी वाढले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांची नावे आणि त्यांचे किती कर्ज माफ करावयाचे आहे, याची यादी राज्य शासनाकडून दरदिवशी बँकांकडे पाठविली जाणार आहे. कर्जमाफीचे कुणाचे फॉर्म चुकले असतील, तर ते रद्द केले जाणार नाहीत. त्रुटी दूर करून पुन्हा शेतकºयांकडून भरून घेतले जातील आणि कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
कापसाची खरेदी सुरू : सरकारची कापूसखरेदी आज सुरू झाली. शेतकºयांकडून कमी भावाने खरेदी करून, तो सरकारी केंद्रावर जादा भावाने विकण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निकषात बसणा-या शेवटच्या शेतक-यास कर्जमाफी मिळत नाही, तोवर ही योजना सुरूच राहील. कर्जमाफीचा प्रारंभ झाल्याने, आमच्या सरकारसाठी कर्तव्यपूर्तीचा आजचा दिवस ऐतिहासिक आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री