पेट्रोलपंपाच्या मीटरमध्ये फेरफार करून कोट्यवधींची लूट

By admin | Published: May 23, 2017 03:57 AM2017-05-23T03:57:04+5:302017-05-23T03:57:04+5:30

त्तर प्रदेश व महाराष्ट्रातील पेट्रोलपंपावरील मीटरमध्ये सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोलद्वारे फेरफार करून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या विवेक हरिश्चंद्र शेट्टे

Loot of billions of rupees by changing petrol pump | पेट्रोलपंपाच्या मीटरमध्ये फेरफार करून कोट्यवधींची लूट

पेट्रोलपंपाच्या मीटरमध्ये फेरफार करून कोट्यवधींची लूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील पेट्रोलपंपावरील मीटरमध्ये सॉफ्टवेअर आणि रिमोट कंट्रोलद्वारे फेरफार करून कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या विवेक हरिश्चंद्र शेट्टे (रा. डोंबिवली, ठाणे) आणि अविनाश मनोहर नाईक (रा. चिंचवड, पुणे) या दोघांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या लखनऊ विशेष कृती दल आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत रविवारी रात्री अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून २०१ रिमोट कंट्रोल, ११० मायक्रो चिप, २१० आर एक्स रीसीव्हर अशी पंपावरील मीटरमध्ये फेरफार करणारी यंत्रसामग्री हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. मीटरमध्ये फेरफार करून ग्राहकांना एका लीटरमागे सुमारे १०० मिलिलीटर कमी पेट्रोल देणाऱ्या टोळीविरुद्ध गेल्या दीड महिन्यापासून लखनऊ पोलिसांच्या विशेष कृती दलाचे पोलीस अधीक्षक अमित पाठक, अपर अधीक्षक अरविंद चतुर्वेदी यांच्या नेतृत्वाखाली मोठी मोहीम सुरू आहे. यात पोलीस निरीक्षक राजेशचंद्र त्रिपाठी यांच्या पथकाने अजय चौरसिया याला लखनऊ परिसरातून अटक केली. त्याच दरम्यान, पोलिसांनी उत्तर प्रदेशातील २३पेक्षा अधिक पेट्रोलपंपांवर छापे टाकून २० ते २५ जणांना अटक केली. त्या वेळी चौरसियाने विवेक आणि अविनाश या दोघांची नावे उघड केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि लखनऊ एसपीटीएफचे निरीक्षक त्रिपाठी यांच्या पथकाने या दोघांनाही अटक केली. दोघांनाही ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिली आहे.
आॅईल कंपन्यांचे अधिकारी सामील
एक हजारांहून अधिक पेट्रोल पंपावर अशा चीप्स लावल्याची माहिती यांच्यातील एका आरोपीने पोलिसांना दिली. हेराफेरीमध्ये वजन मापे विभागाच्या अधिकाऱ्यांसह आॅईल कंपन्यांचे अधिकारीही सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी अनेक मशिन उत्तर प्रदेशमधून जप्त केल्या. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी धाडसत्र राबविले.
...........................
अशी केली जाते फसवणूक
पेट्रोलपंपावरील या हेराफेरीत टोळीतील दोन ते तीनजण सामील व्हायचे. त्यातील एकजण इंधन भरायचा, तर दुसरा पैशाची थैली आणि रिमोट घेऊन उभा असायचा. इंधन भरण्याचे काम सुरु असताना रिमोटद्वारे तो इंधनाचा पुरवठा रोखून धरायचा. मात्र इंधन भरले जात असताना मशिनच्या स्क्रीनवर त्याचा पुरवठा आणि त्याकरिता लागणाऱ्या पैशाची मोजणी सुरु असायची. त्यामुळे ग्राहकाला आपल्या वाहनात पुरेसे इंधन भरले गेलेले नाही, याचा संशय येत नव्हता.
............................

..........................
मुंबई, ठाण्यातही सुरु आहे फसवणूक
या सॉफ्टवेअरची उत्तर प्रदेशसह देशभरातील अनेक भागांमध्ये विक्री झाल्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबईतील पेट्रोलपंपावर अशाच पद्धतीने इंधनाची चोरी सुरु असल्याची शक्यता गृहीत धरुन ठाणे पोलीस तपास करणार असल्याचे पोलीस आयुक्त सिंग यांनी सांगितले.


महिन्याला १५ लाखांची कमाई
लखनऊच्या एसटीएफ पथकाने यापूर्वी २७ एप्रिल २०१७ रोजी सात पेट्रोलपंपांवर छापा
टाकला होता. त्याचवेळी पेट्रोलपंपातील पुरवठा मशिनमध्ये एक विशिष्ट चिप लावून लीटरमागे १० ते १५ टक्के पेट्रोलची चोरी केली जात असल्याचे उघड झाले. ही चिप तीन हजारांत विकली जात होती. ५०० रुपयांच्या पेट्रोलमध्ये
३० ते ५० रुपयांची
चोरी केली जात होती.

फेरफार करणारे उच्चशिक्षित
पंपावरील फेरफार करणारे सॉफ्टवेअर बनविणारा शेटे हा एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स आहे तर रिमोट तयार करणारा नाईक हा पुण्याच्या चिंचवडमध्ये रिमोटचे उत्पादन करीत होता. या जोडगोळीने शेकडो पंपांना हे सॉफ्टवेअर आणि रिमोट विकून मोठी कमाई केली.

Web Title: Loot of billions of rupees by changing petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.