कर्ज फेडण्यासाठी चक्क ज्वेलरी शॉप लुटले
By admin | Published: October 24, 2015 12:30 PM2015-10-24T12:30:30+5:302015-10-24T12:37:59+5:30
कर्ज फेडण्यासाठी ज्वेलर्सचे दुकान लुटणा-या बंधूंच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
Next
>लुटारू बंधू जेरबंद : गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई : कर्ज फेडण्यासाठी ज्वेलर्सचे दुकान लुटणा:या बंधूंच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष आठला यश आले आहे. मनोहर राजपूत (26), मदनसिंग राजपूत (29) अशी अटक करण्यात आलेल्या बंधूंची नावे असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले 15 लाख किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
सांताक्रूझ येथील मिठालाल ज्वेलर्सच्या मालकाला चाकूचा धाक दाखवून दुकानातील 15 लाख किमतीचे दागिने चोरी झाल्याची घटना 18 ऑक्टोबर रोजी घडली. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध सुरू केला. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष आठचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांचे तपास पथक करत होते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कांदिवली रेल्वे स्थानकातून राजपूत बंधू राजस्थानला जाणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले यांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास वाव्हळ यांच्या तपास पथकाने सापळा रचून राजपूत बंधूंना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कांदिवली येथे नातेवाइकांच्या घरी ठेवलेले चोरीचे 15 लाख किमतीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे राजस्थान येथील असलेले राजपूत बंधू नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास होते. त्यापैकी मदनसिंग हा 12 वर्षापासून तर मनोहर गेल्या 6 वर्षापासून मुंबईत वास्तव्यास आहे. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी दोन वर्षापूर्वी कांदिवली येथे ज्वेलर्स दुकान टाकले होते. मात्र तोटय़ामुळे त्यांच्यावर 15 लाखांचे कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी ही लूट केल्याचे सांगितले.(प्रतिनिधी)