लातुरात दोन बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त
By admin | Published: June 18, 2017 12:42 AM2017-06-18T00:42:55+5:302017-06-18T00:42:55+5:30
एटीएस, स्थानिक गुन्हे शाखा आणि दूरसंचार विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या संयुक्त कारवाईत शहरातील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसरातील बेकायदेशीर
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : एटीएस, स्थानिक गुन्हे शाखा आणि दूरसंचार विभागाच्या पथकाने शुक्रवारी रात्री केलेल्या संयुक्त कारवाईत शहरातील प्रकाश नगर, राजीव गांधी चौक परिसरातील बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त केले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. यात हैदराबाद येथील एकाचा सहभाग असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
प्रकाश नगर येथील मातृछाया अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज चालविण्यात येत असल्याची माहिती, एटीएसला मिळाली होती. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा
आणि भारतीय दूरसंचार निगमच्या पथकांसह एटीएसने तेथे छापा टाकला. या वेळी या अपार्टमेंटमधील शंकर रामदास बिरादार यांच्या प्लॅटमधून बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज चालविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
या वेळी बिरादार याच्याकडे चौकशी केली असता, नंदी स्टॉप औसा रोड येथील राजवीर एंटरप्रायजेसचा मालक रवी राजकुमार साबदे हा राजीव गांधी चौक परिसरातील शिवगुरू कुंज या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर बेकायदेशीर टेलिफोन एक्स्चेंज चालवित असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार या तिन्ही पथकांनी तिथेही छापा टाकला असता, इलेक्ट्रॉनिक सिस्टिमद्वारे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालविण्यात येत असल्याचे उघड झाले.
डिस्२२ोंबर २०१६पासून हे दोघे हा बेकायदेशीर व्यवसाय करीत होते. यात हैदराबाद येथील फैज मोहम्मद हाही सहभागी असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी रवी राजकुमार साबदे (२७), शंकर रामदास बिरादार (३३) आणि फैज मोहम्मद यांच्याविरुद्घ कलम ४२०, ३४ भादंविसह भारतीय टेलिग्राफ कायदा १९८५चे कलम ४, २०, २५सह इंडियन वायरलेस टेलिग्राफ अॅक्ट १९३३चे कलम ३, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासनाला १५ कोटींचा फटका
बेकायदा टेलिफोन एक्स्चेंजमध्ये गेट-वे मशीनच्या साहाय्याने कॉल डायव्हर्ट करून साबदे, बिरादार आणि फैज मोहम्मद या तिघांनी शासनाला तब्बल १५ कोटी २० लाख ६४ हजारांना चुना लावला. दोन्ही ठिकाणांवरून ३ लाख ६५ हजार ५०० रुपयांच्या विविध साहित्यासह १८१ सीमकार्ड जप्त केले आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अपार्टमेंटमधील रहिवाशांना अशा प्रकारे इथे बेकायदेशीर कारभार सुरू असल्याची कुणकुणही तब्बल सहा महिने लागली नाही.
फैज मोहम्मदचा संबंध?
हा फैज मोहम्मद कोण? त्याचा लातुरातील दोघांशी संबंध कसा आला? यांचा विदेशात कुठे संपर्क झाला? याची अधिक चौकशी सुरू आहे. फैज मोहम्मदची पोलीस आणि एटीएस पथकाकडून चौकशी झाल्यानंतरच या प्रकरणाची पूर्ण माहिती पुढे येणार आहे. या प्रकरणाचा पोलीस वेगवेगळ्या अंगाने तपास करीत आहेत.
रवी साबदे, शंकर बिरादार यांनी केवळ पैसे मिळविण्यासाठी हे अवैध टेलिफोन एक्स्चेंज उभारल्याचे पुढे आले आहे. त्याच्या माध्यमातून देश-विदेशात कॉलिंग झाले असले तरी, दहशतवादी संघटनांशी कुठलाही संपर्क झाला नसल्याचे प्राथमिक चौकशीतून पुढे आले आहे.
- डॉ. शिवाजीराव राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक