हप्ता साडेआठ लाख लोकांकडून, लाभ फक्त २१४ जणांनाच!, पंतप्रधानांच्या नावे असलेल्या विम्यातही लुबाडणूकच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 11:37 AM2022-03-28T11:37:22+5:302022-03-28T11:41:14+5:30
चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : चक्क पंतप्रधानांच्या नावे असलेल्या ‘सुरक्षा विमा योजना’ व ‘जीवन ज्योती’ योजनेमध्ये बँका लोकांच्या खात्यातून दरवर्षाला हप्ता तर कपात करून घेतात, परंतु त्याचा लाभ फारसा कुणाला होत नसल्याचेच चित्र पुढे आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात ८ लाख ४६ हजार २०६ लोकांच्या खात्यातून या योजनांसाठी हप्ता घेतला आहे, परंतु प्रत्यक्षात फक्त २१४ लोकांना विमा संरक्षणाची रक्कम मिळाली आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएसबीवाय) आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय) सुरू करण्यात आल्या. सुरक्षा योजनेत १८ ते ७० वयोगटातील व्यक्तीच्या बँक खात्यातून वर्षाला १२ रुपये हप्त्यापोटी बँका कपात करून घेतात. त्याचा अपघाती मृत्यू किंवा शंभर टक्के अपंगत्व आल्यास २ लाख रुपये मिळतात. कमी अपंगत्व असल्यास १ लाख रुपये मिळतात.
जीवन ज्योती योजनेत १८ ते ५० वयोगटातील व्यक्तीच्या खात्यातून वर्षाला ३३० रुपये कपात करून घेतले जातात. त्याचा मृत्यू झाल्यास त्यास २ लाख रुपये मिळतात. थेट देशाच्या पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजनेत पारदर्शीपणाचा कमालीचा अभाव आहे. कारण या दोन्ही योजनांचा लाभ किती लोकांना झाला, हेच कोणत्याही टप्प्यावर सांगितले जात नाही. प्रत्येक जिल्ह्यातील अग्रणी बँकेकडून किती लोकांचा विमा हप्ता बँकांनी कपात करून घेतला, याची माहिती आहे, परंतु त्याचवेळेला योजनेचा लाभ किती लोकांना मिळाला, याची माहिती उपलब्ध नाही.
कंपन्यांचे खिसे भरण्याचे काम...
- बँका लोकांच्या खात्यातून प्रत्येकवर्षी ३१ मे रोजी या हप्त्याची रक्कम ॲटो डेबिटने कपात करून घेतात.
- परंतु त्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ देण्यासंदर्भात कोणतीच जबाबदारी घेत नाहीत.
- कुणाचे निधन झाले हे आम्हाला कसे समजणार, अशी बँकांची भूमिका असते. त्यामुळे केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीचेच खिसे भरण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे.
कोल्हापुरातील चित्र
योजनेचे नाव सहभागी किती झाले? लाभ किती जणांना मिळाला?
प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना ६ लाख १८ हजार ९७७ फक्त -२४
प्रधानमंत्री जीवनज्योती योजना २ लाख २७ हजार २२९ फक्त - १९०
या दोन्ही योजनांच्या हप्त्यापोटी एका वर्षात लोकांनी भरलेली रक्कम : ८ कोटी २४ लाख १३ हजार २९४
या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना मिळालेली रक्कम : ४ कोटी २८ लाख (सरासरी दोन लाख मिळाले असे गृहित धरून)