भगवानदादा यांचे सुपुत्र अरुण पालव यांचे निधन
By admin | Published: September 10, 2016 05:11 AM2016-09-10T05:11:10+5:302016-09-10T05:11:10+5:30
भगवानदादांचे ज्येष्ठ सुपुत्र अरुण पालव यांचे शुक्रवारी वाशी येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नुकताच चर्चेत आलेल्या ‘एक अलबेला’ चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे, त्या भगवानदादांचे ज्येष्ठ सुपुत्र अरुण पालव यांचे शुक्रवारी वाशी येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
पालव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरुण पालव अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होते. निवृत्तीनंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या आठवणी जतन करण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ते भगवानदादांच्या अनेक चाहत्यांना भेटले. आपल्या आजारपणावर मात करत तब्बल तीन वर्षे विविध आठवणी, कागदपत्रे गोळा केली आणि ‘एक अलबेला’च्या प्रवासाला सुरुवात केली.
अरुण दादांचा उत्साह दांडगा
- मंगेश देसाई
‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या निमित्ताने अरुणदादांची भेट झाली होती. त्या प्रवासादरम्यान शूटिंग सुरू असताना गणपतीच्या गाण्यावर, भोली सूरत या गाण्यांवर ते माझ्यासोबत थिरकलेही होते. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा तरुणांनाही लाजवेल अशी होती. (प्रतिनिधी)