भगवान बालाजींचे चरण स्पर्श करुन दर्शन
By admin | Published: October 13, 2016 08:46 PM2016-10-13T20:46:39+5:302016-10-13T20:46:39+5:30
शहरातील १३६ वर्षाची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. त्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 13 - शहरातील १३६ वर्षाची परंपरा असलेल्या बालाजी रथोत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता झाली. त्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी यांची मूर्ती या रथातून खाली उतरावून गाभाऱ्याबाहेर भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात आल्या. वर्षातून फक्त एकदाच भाविकांना भगवान बालाजी यांच्या मूर्तीचे चरण स्पर्श करुन दर्शन घेण्याची संधी मिळते. त्यामुळे दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती.
दरवर्षी विजयादशमीनंतर एकादशीला शहरातून बालाजी रथयात्रा निघते. यंदाही एकादशीला बुधवारी १२ आॅक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता बालाजी रथयात्रा पारंपारिक मार्गाने रथयात्रा मार्गस्थ झाली. रथयात्रेचा समारोप दुसऱ्यादिवशी सकाळी ११ वाजता खोलगल्लीतील बालाजी मंदिराजवळ झाला.
विधीपूर्वक मूर्त्या उतरविल्या - रथयात्रा मंदिरावर पोहचल्यानंतर भगवान बालाजी आणि श्रीदेवी व भूदेवी यांच्या मूर्र्तींची विधीपूर्वक पूजाअर्चा केल्यानंतर रथातून खाली उतरविण्यात आल्या. मूर्ती खाली उतरवितांना आपला हात मूर्तीला लागावा यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती.
रथातून तीनही मूर्ती खाली उतरविल्यानंतर त्यांची गाभाऱ्याबाहेर पूजा करुन त्या भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. वर्षातून एकदाच भगवान बालाजी यांचे अगदी जवळून चरण स्पर्श करुन दर्शन होते. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मूर्ती दर्शनासाठी बाहेर ठेवण्यात आल्या होत्या.
सायंकाळी पंचामृताने अभिषेक- सायंकाळी सहा वाजता तिघा मूर्त्यांचा पंचामृताने विधीपूर्वक अभिषेक करण्यात येतो. हा विधी सुमारे एक तास चालतो. त्यानंतर रात्री नेहमीप्रमाणे आरती होती.
बालाजींची पालखी - रात्री आरतीनंतर तिघी मूर्त्या बाहेरच ठेवलेल्या असता. दुसऱ्या दिवशी पालखीतून भगवान बालाजीसह तिनही मूर्ती पांझरा नदीकाठावरील घाटावर नेण्यात येतात. याठिकाणी मूर्र्तींना अभ्यंग स्रान केल्यानंतर पालखी ही गरुड बागेत परंपरेनुसार मुक्कामी राहते.
याठिकाणी एक दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी दुसऱ्या सकाळी मंदिराकडे मार्गस्थ झाली.
पालखी मंदिरावर पोहचल्यानंतर त्याठिकाणी विधीपूर्वक पूजाअर्चा केल्यानंतर तीनही मूर्र्तींची गाभाऱ्यात स्थापना केली जाते. त्यानंतर बालाजी रथोत्सव सोहळा पूर्ण होतो.