शहीद रवींद्र धनावडेंचं पार्थिव आज साताऱ्यात, पुलवामात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आलं होतं वीरमरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 01:47 PM2017-08-27T13:47:40+5:302017-08-27T13:51:19+5:30
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले.
सातारा, दि. 27 - जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. चकमकीत शहीद झालेले जवान रवींद्र धनावडे यांचं पार्थिव दुपारनंतर श्रीनगरहून एअरक्राफ्टनं पुण्यात दाखल होणार आहे. त्यानंतर धनावडे यांच्या मूळ गावी म्हणजे साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातल्या मोहत गावी ते नेण्यात येईल.
रवींद्र धनावडे यांच्या निवृत्तीला अवघे सात महिने उरले होते -
निवृत्तीला अवघे सात महिने उरले असताना रवींद्र धनावडे यांना वीरमरण आले. सैन्य दलाने शनिवारी सायंकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. मोहोट येथील धनावडे कुटुंबीयांना ते शहीद झाले असल्याचे कळवायला पोलीस लगेच रवाना झाले.
रवींद्र धनावडे हे हुतात्मा झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे. रवींद्र धनावडे हे मार्च 2018 मध्ये निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीत दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) चार जवान, काश्मीरचे तीन विशेष पोलीस अधिकारी व एक पोलीस शिपाई असे आठ जण शहीद झाले. हुतात्म्यांमध्ये सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यातील हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे यांचाही समावेश आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी तिन्ही अतिरेक्यांना ठार केले आहे.
अलीकडील काळातील हा काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. हे तिन्ही दहशतवादी परदेशी होते, असे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले. दहशतवादी हल्ल्यात इतके जवान व पोलीस हुतात्मा होणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान मरण पावले, तर आॅपरेशन पूर्ण झाल्यानंतर अतिरेक्यांनी टाकलेले बॉम्ब निकामी करताना दोघांना मरण आले.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तीन ते चार अतिरेकी पोलीस वसाहत असलेल्या भागात घुसले. त्या कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांची अनेक घरे व पोलिसांची कार्यालये आहेत. अतिसुरक्षित म्हणून ओळखला जाणारा व कडेकोट बंदोबस्त असलेला हा भाग आहे. अशा ठिकाणी हे दहशतवादी कसे घुसले, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ते गोळीबार करीतच कॉम्प्लेक्समध्ये घुसले. पोलिसांच्या इमारतीतून त्यांनी बाहेरच्या दिशेने ग्रेनेडही फेकले. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व पोलीस जखमी झाले. पहाटे अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सारेच काहीसे गोंधळून गेले. मात्र लगेच जवान व पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यात एक दहशतवादी मारला गेला. हे आॅपरेशन १५ तास चालले. त्यानंतर तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात आले.
चकमक संध्याकाळी संपली
त्या वसाहतीत अनेक पोलीस आपल्या कुटुंबांसह राहतात. मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर अतिरेक्यांनी हल्ला केला नाही वा कुटुंबीयांपैकी कोणाला ओलीसही ठेवले नाही.
सुरुवातीला दहशतवाद्यांची संख्या तीन ते चार असावी,
असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. एक अतिरेकी सकाळीच ठार झाला. संध्याकाळी गोळीबार पूर्णत: थांबला, तेव्हाच अतिरेक्यांची संख्या तीन होती, हे स्पष्ट झाले.